नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतिस्पर्धींना नमवून निखील लोखंडे, अंजली प्रजापती, निशिकांत मेश्राम आणि गुरूचंदन तांबे आपापल्या गटात ‘चॅम्पियन’ ठरले.
उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे झालेल्या स्पर्धेतील पुरूष गटात निखील लोखंडेने 25-7, 25-11 अस दोन सेटमध्ये राहुल वर्माचा पराभव करून अजिंक्यपदावर मोहोर उमटविली. पाचवा मानांकीत इशान साखरेला पराभवाचा धक्का देऊन अंतिम फेरी गाठणाऱ्या बिगरमानांकीत राहुल वर्माने अंतिम सामन्यात निखील लोखंडेला चांगलीच टक्कर दिली. पुरूष गटात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इरशाद अहमदला यश मिळाले.
महिलांच्या सामन्यात आपली विजयी मोहिम कायम राखत रॉय क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजली प्रजापतीने अंतिम लढतीतही बाजी मारली. तिने रॉय क्लबच्याच दिप्ती निशादचा 16-20, 25-1, 21-10 ने पराभव करून विजेतेपद पटकावले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुष्पलता हेडाउला नमविण्यात डिम्पल परातेला यश आले.
प्रौढांच्या गटातही निशिकांत मेश्रामने आपली विजयी मोहिम कायम राखत अंतिम सामना जिंकला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिनेश बागडेला 19-21, 22-5, 16-15 ने पराभूत करीत निशिकांतने अंतिम लढत आपल्या नावे केली. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात इम्तियाज अहमदला पराभूत करीत संदीप गजीमवारने विजय मिळविला. वैयक्तिक गटात ओम क्रीडा मंडळाच्या गुरूचंद्रन तांबेने हितेश जांभुळकरला मात देत विजय मिळविला. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात ओम क्रीडाच्या रजत कोटांगलेने त्याच्याच मंडळाच्या तोमेश्वर परातेचा पराभव केला.
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. मिलींद माने, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष गणेश कानतोडे, माजी नगरसेवक महेंद्र धनविजय, कॅरम असोसिएशनचे मो. इकबाल, मुकुंद नागपूरकर, गौरव सोनटक्के आदी उपस्थित होते.