नागपूर समाचार : सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी त्यांनी डॉ. मेश्राम यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री माजी आमदार डॉ. मिलिंद माने, शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीश सिरसवान, महामंत्री शंकर मेश्राम, महिला प्रमुख मोहिनी रामटेके आदी उपस्थित होते. ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शाल, पुष्पगुच्छ देउन डॉ. मेश्राम यांना सन्मानित केले. ॲड. मेश्राम यांनी त्यांचे ‘दखल’ हे पुस्तक यावेळी डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना भेट स्वरूपात दिले.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ते म्हणूनच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) चे ट्रस्टी आहेत. जगातील १२२ देशांमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. याशिवाय ते १०४ देशांचा समावेश ट्रॉपिकल अँड ज्योग्राफिकल न्यूरोलॉजी स्पेशॅलिटी ग्रुपचे देखील अध्यक्ष आहेत. वंचित शोषित वर्गांचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. चंद्रेशेखर मेश्राम जगात देशाचे ठळक नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आभार मानले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना जाहिर झालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे वंचित, शोषितांच्या चळवळीचे काम करणा-या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान असल्याची भावना देखील ॲड. मेश्राम यांनी व्यक्त केली.