मनपाच्या संबंधित विषयांवर आज बैठक घेण्याच्या सूचना
नागपूर समाचार : सफाई कामगारांच्या विविध मागण्यांचे विषय तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. महानगर पालिकेसंबंधित सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज ६ फेब्रुवारी २०२४ रोजी बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
येत्या ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगारांच्या विविध विषयांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे, तत्पूर्वी डॉ.इटनकर यांनी या विषयांसंदर्भात आढावा घेतला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेसिनी तेलगोटे, मनपा उपायुक्त गजेंद्र महल्ले, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) विजय माहुसकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलूरकर, कामगार कल्याण विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
सफाई कामगारांना सेवानिवृत्ती नंतर देण्यात येणारे विविध लाभ, जातपडताळणी कार्यालयात प्रलंबित असणारे सफाई कामगारांचे प्रकरणे अशा एकूण १३ विषयांवर यावेळी चर्चा झाली. या विषयांबाबत डॉ.इटनकर यांनी सद्य: परिस्थिती जाणून घेतली तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सफाई कामगारांच्या संबंधित मागण्या तातडीने पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे निर्देश दिले.
कोविड महामारीच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या महानगर पालिकेच्या सफाई कामगारांना द्यावयाची मदत, मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तींना लाड पागे समितीच्या निर्देशानुसार नोकरी देणे, सफाई कामगारांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करणे आणि महा दलित महासंघाने निर्देशित केलेले मनपात कार्यरत अनुभव नसणारे व पारंपरिक कामे करणाऱ्या सफाई कामगारांबाबतचे विषय मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून निकाली काढण्याचे निर्देशही डॉ.इटनकर यांनी बैठकीत दिले.