- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : कुमार गंधर्व जन्‍म-शती समारोह ‘कालजयी’ 17 व 18 फेब्रवारी रोजी

शास्‍त्रीय संगीतातील दिग्‍गज कलाकारांची सजणार मैफल

नागपूर समाचार : प्रसिद्ध भारतीय शास्‍त्रीय गायक व संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा पद्मविभूषण पं. कुमार गंधर्व यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त कुमार गंधर्व प्रतिष्‍ठान व सप्‍तक, नागपूर यांच्‍या संयुक्‍तवतीने येत्‍या, 17 व 18 फेब्रुवारी 2024 दरम्‍यान ‘कालजयी’ या शास्‍त्रीय संगीताच्‍या मैफलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील दिग्‍गज गायक, वादक कलाकारांना ऐकण्‍याची नागपूरकरांना संधी मिळणार आहे. 

पं. कुमार गंधर्वांच्‍या अनोख्‍या गायन शैलीचा भारतीय शास्‍त्रीय संगीतावर खोलवर प्रभाव आहे. भारतीय रागसंगीताचे भावसौंदर्य आणि रागसंगीताला आपल्‍या दैवी स्‍वरांचा साज चढवत त्‍यांनी अनेक पारंपरिक व स्‍वरचित रचना स्‍वरबद्ध केल्‍या. लोकसंगीताला शास्‍त्रीय बाज चढवून आणि शास्‍त्रीय संगीताला लोकाभिमुख करीत अनेक राग आणि रचना त्‍यांनी प्रस्‍थापित केल्‍या. अशा या अद्वितीय गायकाची जन्‍मशताब्‍दी व भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवाचे औचित्‍य साधून भारत सरकारच्‍या सांस्‍कृतिक मंत्रालयांतर्गत देशभरात विविध ठिकाणी हा समारोह आयोज‍ित केला जात आहे. 

शनिवार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्‍टंट सिस्‍टीम, गायत्री नगर येथे ‘कालजयी’ समारोहाला प्रारंभ होईल. यात पं. कुमार गंधर्व यांचे नातू व प्रसिद्ध शास्‍त्रीय गायक भुवनेश कोमकली यांचे गायन, गुंदेचा ब्रदर्स नावाने सुपरिचित असलेले डागर वाणीच्‍या ध्रुपद प्रकाराचे गायक उमाकांत गुंदेचा व अनंत गुंदेचा यांचे गायन व संगीत नाटक अकादमी पुरस्‍कार विजेते तेजेंद्र नारायण मजूमदार यांचे सरोद वादन होणार आहे. 

रविवार, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्‍मीनगर येथील सायंटिफीक सभागृहात कुमारजींच्‍या सांगीतिक प्रवासावर दृक-श्राव्‍य माध्‍यमातून प्रकाश टाकला जाईल. या कार्यक्रमात केशव चैतन्‍य कुंटे, डॉ. साधना शिलेदार व पं. सतीश व्‍यास यांचा सहभाग राहणार आहे. 

याच दिवशी, सायंकाळी 5 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृहात किराणा व ग्‍वाल्‍हेर घराण्‍याच्‍या गायकीचा सुरेख संगम असलेल्‍या प्रसिद्ध शास्‍त्रीय गायिका सावनी शेंडे, युवा शास्‍त्रीय गायक प्रभाकर व दिवाकर कश्‍यप व जयपूर-अतरौली घराण्‍याचे प्रसिद्ध शास्‍त्रीय गायिका श्रुती सडोलीकर यांचे गायन होईल. या कलाकारांना तबल्‍यावर रामेंद्र सिंह सोलंकी, ईशान घोष, संदेश पोपटकर व अभय दातार संगत करतील तर पखावजवर अखिलेश गुंदेचा आणि हार्मोनियमवर अनंत जोशी व श्रीकांत पिसे संगत करतील. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणा-या प्राधान्‍य देण्‍यात येणार आहे. मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहून कार्यक्रमाचा आस्‍वाद घ्‍यावा असे आवाहन कुमार गंधर्व प्रतिष्‍ठान व सप्‍तकतर्फे करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाला परसिस्‍टंट कंपनी, थिंक फायनान्‍स व आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे सहकार्य लाभले आहे. 

पत्रकार परिषदेला सप्‍तकचे डॉ. उदय गुप्‍ते, विलास मानेकर, उदय पाटणकर, नितीन सहस्त्रबुद्धे, विकास लिमये, प्रदीप मुन्‍शी व श्रीकांत देशपांडे यांची यांची उपस्‍थ‍िती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *