- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आकर्षक अन् मनमोहक फुलांनी बहरलेल्या मनपाच्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

लता मंगेशकर उद्यानात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ‘पुष्पोत्सव’

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पूर्व नागपुरातील लता मंगेशकर उद्यानात प्रथमच ‘पुष्पोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. निरनिराळ्या प्रकारचे शोभिवंत फूलं, विविध वनस्पती औषधीच्यां झाडांच्या कुंड्या, पुष्परचनेने खुललेल्या आकर्षक आणि मनमोहक अशा मनपाच्या ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाचे रविवारी (ता.११) रोजी आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या प्रमूख उपस्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, श्रीमती डॉ. अनुश्री अभिजीत चौधरी, उद्यान अधीक्षक श्री.अमोल चौरपागर, कार्यकारी अभियंता श्री. संजय गुजर, विनोद डोंगरे, माजी नगरसेवक श्री. प्रदीप पोहाने, माजी नगरसेविका श्रीमती कांता रारोकर, श्रीमती चेतना टांक, श्रीमती अनिता वानखेडे, माजी नगरसेवक श्री. बाल्या बोरकर, श्री. अनिल गेंढरे, श्री. प्रशांत धर्माधिकारी, श्री.भूषण सारवे, श्री. विष्णू थोटे, श्री. श्रीकांत देशपांडे, श्री. कपिल मैडमवार, श्री.डी.जी चौखट, श्री. सतीश टावरी, श्री. अंबरीश घटाटे यांच्यासह स्थानिक नागरिक, लहान मुले प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते फीत कापून पुष्पोत्सव प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, पूर्व नागपुरातील पहिल्यांदाच अशा पुष्पोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना निरनिराळ्या प्रकारच्या पुष्परचना, आकर्षक कलाकृती एकाच ठिकाणी बघता येणार आहे. या उद्यानाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले असून, नागपूर महानगरपालिकेद्वारे उद्यानाची उत्तम देखभाल केली जात आहे. नागरिकांनी देखील पुष्पोत्सव प्रदर्शनाला मोठ्या संख्येत भेट द्यावी व प्रदर्शनाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन आ.कृष्णा खोपडे यांनी यावेळी केले.

तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले की, नागपूर शहरातील उद्यान हे नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याची योग्य देखभाल, दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांसाठी तेथे मुलभूत सोयी उपलब्ध व्हाव्या या करिता मनपा नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. मनपाने प्रथमच अशा प्रकारच्या पुष्पोत्सव प्रदर्शनाचे आयोजन केले असून, येत्या डिसेंबर व जानेवारी महिन्यात शहरातील विविध उद्यानात पुष्पोत्सव प्रदर्शन भरविण्याचा मानस मनपाचा आहे. शहरातील जनतेमध्ये फुले व उद्यानाबाबत जागृती आणि आकर्षण वाढविण्याच्या अनुषंगाने आयोजित पुष्पोत्सव उत्सव प्रदर्शन १४ फेब्रुवारी पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले.

उद्घाटनानंतर मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शनाचे अवलोकन केले. तसेच उद्यानातील परिसरात वृषारोपण करण्यात आले. पुष्पोत्सव प्रदर्शनात नागरिकांना झेंडू, पिटोनिया, डायनथस, देहेलिया, गुलाब, जर्बेरा, कॅलेंडुला, प्लँटेला, झिनिया यासारखे १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पतीची झाडे एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळतं आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत नागरिकांना दिली जात आहे. 

फुलांनी सजलेली रेल्वे गाडी आकर्षणाचे केंद्र

पुष्पोत्सव प्रदर्शनासाठी संपूर्ण उद्यानाला सजविण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर भारतरत्न गाणं कोकिळा लता मंगेशकर यांचे तैलचित्र तसेच सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे. याशिवाय उद्यानाच्या मुख्य द्वारावर आकर्षक सितार ठेवण्यात आले आहे.

उद्यानाच्या मध्यभागी लक्षवेधी अशी बासरी व त्यावर विराजमान कोकिळा अशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर त्या ठीक पुढे फुलांनी सजलेली रेल्वे गाडी ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. प्रदर्शनात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. तर फुलांनी भरलेल्या दोन मचान उद्यानाच्या दोन्ही दिशेस आकर्षक रित्या सजविण्यात आले आहेत.

माती कला, ओरेगामी अन विविध खेळ

उद्यानात येणाऱ्या लहान चिमुकल्यांसाठी खेळण्याची सोय करण्यात आली असून, मुलांना माती कलेची माहिती व्हावी याकरिता विशेष सत्र घेण्यात येत आहे. ज्यात माती द्वारे तयार करण्यात येणारे भांडी, कलाकुसर आदी विवीध बाबी मुलांना प्रत्यक्ष शिकता व अनुभवता येत आहे.

आकर्षक लक्षवेधी रोषणाई 

आकर्षक आणि लक्षवेधी अशा रोषणाईने संपूर्ण लता मंगेशकर उद्यान उजळले आहे. रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या या आकर्षक रोषणाई ला बघण्यासाठी नागरिक वारंवार प्रदर्शनाला भेट देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *