महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थिती
नागपूर समाचार : वन उत्पादनांच्या निर्मितीचा पाच दशकाहुन अधिकचा अनुभव असणारे अग्रेसर महामंडळ अशी ओळख महाराष्ट्र वन विकास महामंडळाने जपली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन असलेले, आर्थिक प्रगती साध्य करुन लाभांश बाबत उत्तम कार्य करणारे महामंडळाची अशी वेगळी ओळख आपल्या महामंडळाने निर्माण केली आहे. यशाच्या या टप्प्यानंतर आता महामंडळाने रोजगार निर्मितीमध्ये पुढे यावे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महाराष्ट्र वन विकास महामंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर, पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता यांच्यासह वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्री पुढे म्हणाले की, राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प व वास्तू निर्मितीमध्ये महाराष्ट्र वन विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अवघ्या भारताच्या श्रद्धेचे आदर्श सलेल्या राम मंदिराचे प्रवेशद्वार असो किंवा संसद भवनाची द्वार निर्मिती आपल्या महाराष्ट्राच्या वन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण सागवान लाकडापासून झाली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
गेलल्या 50 वर्षाचे सिंहावलोकन केले असता महामंडळाची आतापर्यंतची वाटचाल ही अत्यंत दैदीप्यमान ठरली आहे. यंदा महामंडळाने सर्वाधिक नफा प्राप्त केला आहे. वन विभागाचा वाघ आणि महामंडळाचा साग अशी एक वेगळी ओळख आता निर्माण होत असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वन विकास महामंडळाच्या यशस्वी वाटचालीत गेल्या पन्नास वर्षात योगदान देणाऱ्या माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वनमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे आणि आसावरी देशपांडे यांनी केले.