नागपूर समाचार : शहरातील सुरेश भट सभागृहात भाजपाच्या शिबिरादरम्यान झालेल्या चेगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी एसआयटीच्या (विशेष तपास पथक) माध्यमातून करण्याची मागणी करणारे निवेदन काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना देण्यात आले.
आमदार विकास ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना हे निवेदन सुपूर्द केले. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिकारी, खासगी कंत्राटदार आणि भाजपच्या अधिकाऱ्यांसह दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. हा कार्यक्रम भाजपने आयोजित केला होता आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यक्रमाला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार होती.
साहित्य वाटप होणार असल्याचा व्यापक प्रचार, प्रसार नागपूर शहरात करण्यात आला होता. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी सुरेश भट सभागृहात झाली होती. सकाळी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर महिलांची गर्दी वाढतच गेली. सभागृहात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे गोंधळात भर पडत गेली. त्यानंतर काही वेळातच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक महिला कामगार जखमी झाल्या.