- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

दक्षिण नागपूर येथील जलकुंभ, स्मार्ट टॉयलेट तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण व भूमिपूजन

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात ८९ जलकुंभ उभारले जात आहेत. त्यातील ८० टक्के जलकुंभ पूर्ण झाले आहेत. आज दक्षिण नागपुरातील सात जलकुंभांचे लोकार्पण होत असून भविष्यात या परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. आज शहरातील ७५ टक्के जनतेला चोवीस तास पाणी मिळत असून संपूर्ण शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) केले.

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते दक्षिण नागपूर येथील जलकुंभाचे, स्मार्ट टॉयलेटचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने मानेवाडा मार्गावरील शेष नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘दक्षिण नागपुरातील सात जलकुंभांच्या माध्यमातून ९० हजार नागरिकांची पाण्याची सोय होणार आहे. भविष्यात टँकरची गरज पडणार नाही. शहरातील कोणत्या भागात किती प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे, कुठे पाण्याची टंचाई आहे आणि कुठे भीषण समस्या आहे, याची माहिती देणारी अद्ययावत यंत्रणा ओसीडब्ल्यूने विकसित केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल.’

दक्षिण नागपुरातील जनतेला सर्वप्रकारची आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणेचे उत्तम असे जाळे निर्माण करण्यात आले आहे. एकीकडे मेडिकल, मेयो आणि दुसरीकडे एम्समध्ये देखील दक्षिण नागपूरच्या गोरगरीब जनतेला उपचार घेता येणार आहे, याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. नागपूर शहरात चौफेर होत असलेल्या विकासाचे श्रेय येथील जनतेलाच असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले. दक्षिण नागपूर भागामध्ये असलेल्या अनियमित लेआउटमध्ये असलेली पाणी आणि ड्रेनेजची समस्या सोडविण्यासाठी उत्तम दर्जाची पाईप लाईन टाकण्याच्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी केल्या. नागरिकांच्या सुविधेकरिता मनपाद्वारे सुरू करण्यात आलेले स्मार्ट सावर्जनिक शौचालय ही उत्तम सुरूवात असल्याचे त्यांनी नमूद केले. चांगली उद्याने, खेळांची मैदाने, प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे मिळवून देत नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले.

या कामांचे भूमिपूजन

तपस्या चौक ते शेष नगर बस स्टॉप, शेष नगर बस स्टॉप-सिद्धेश्वरी मार्ग-पिपळा रोड आणि भगवतीनगर ते नाल्यापर्यंत सिमेंट रोडचे भूमिपूजन यावेळी झाले. तसेच चिखली खुर्द अंतर्गत विविध ले-आऊटमधील रस्त्यांचे डांबरीकरण आणि जबलपूर ले-आऊट ते भगवतीनगर मानेवाडा नाला सुरक्षा भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले.  

या कामांचे लोकार्पण

नालंदानगर, ओंकारनगर, पवनसूतनगर, ताजबाग मेला मैदान, वंजारीनगर, सक्करदरा, बालाजी नगर येछील जलकुंभांचे लोकार्पण यावेळी झाले. तसेच कुंदनलाल गुप्ता ग्रंथालय ई-लायब्ररीचे तर विश्वकर्मानगर व दंतेश्वरी दुर्गा मंदिर येथील आयुष्मान आरोग्य केंद्रांचेही यावेळी लोकार्पण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *