नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूरचा चेहरा-मोहरा बदलला आहे. काँक्रिट रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांचे जाळे विस्तारतानाच मिहानमध्ये हजारो तरुणांना रोजगाराचे दालन खुले करून देण्यात आले.
सिम्बायोसिस, लॉ युनिव्हर्सिटी, एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटीच्या माध्यमातून नागपूरची एज्युकेशन हबच्या दिशेने वाटचाल होत आहे.
सर्वसामान्य जनतेची विकसित शहराची संकल्पना काय आहे, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. ‘आपले नागपूर प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम व्हावे, यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करतोय.
पुढील दहा वर्षांमध्ये आपले नागपूर कसे विकसित केले जावे, यासाठी आपण आपल्या कल्पना किंवा सूचना मला पाठवाव्यात; आपण सारे मिळून जलद गतीने नागपूरचा विकास करुया,’ असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले आहे. या सूचना ngofficenagpur@gmail.com या ई-मेलवर ३० मार्च २०२४ पर्यंत पाठवायच्या आहेत.