रेशीमबाग येथील स्नेहमिलन कार्यक्रमात सहभाग
नागपूर समाचार : नागपुरात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची कामे केली. नागपूर कात टाकत आहे. पण मी एवढ्यावर समाधानी नाही. नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेच माझे ध्येय आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.
रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेविका सौ. कांचनताई गडकरी, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांना लोकसभा निडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी सभागृहात उपस्थित लोकांनी संकल्प केला. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘नागपूर झिरो माईल आहे, टायगर कॅपिटल आहे, लॉजिस्टिक कॅपिटलच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. नागपूर आता एव्हिएशन हब म्हणूनही नावारुपाला येत आहे. नाग नदीच्या प्रकल्पासाठी देखील २४०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. त्याचेही काम सुरू होत आहे. मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि येत्या काळात १ लाख तरुणांना नव्याने रोजगार मिळणार आहे. नागपूरमध्ये एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, सिम्बायोसिस आले. त्यामुळे आता नागपूर एज्युकेशन हब होत आहे,’
शैक्षणिक विकास, उत्तम रस्ते आणि उड्डाणपूल, आरोग्याच्या सुविधा, चोवीस तास पाणी यावर माझा भर राहिला. दिला. आता साडेतीनशे खेळाची मैदाने तयार करायची आहेत, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जलतरण केंद्र तयार करायचे आहेत. याशिवाय सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्माशी संबंधित महोत्सव आयोजित केले. सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना सहभागी करून घेतले. शहरातील सुख-दुःखात सामील होऊन सगळी कामे केली. जात-पात-धर्माचा विचार कधी केला नाही आणि कधी करणारही नाही, असेही ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.