रामेश्वरी येथे जाहीर सभेचे आयोजन; पावसानंतरही लोकांची गर्दी
नागपूर समाचार : राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही. ते समाजकारण आहे. माझ्यादृष्टीने गरिबांची, उपेक्षितांची सेवा करणे हेच खरे राजकारण आहे आणि माझे जीवन आणि राजकारण उपेक्षितांच्या कल्याणासाठीच समर्पित केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. रामेश्वरी येथील काशीनगरमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
या सभेला रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, माजी आमदार नाना श्यामकुळे, रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, अविनाश ठाकरे, रितेश गावंडे, किशोर वानखेडे, रमेश सिंगारे, शरद बांते, संदीप गवई, नागेश मानकर, विशाखा बांते, सुमित्रा जाधव, प्रभुजी अरखेल, वंदना भगत, भारती बुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या काही वेळापूर्वी वादळ-वाऱ्यासह पाऊस येऊन गेला. तरीही लोकांनी सभेला गर्दी केली, याबद्दल ना. श्री. गडकरी यांनी विशेष आभार मानले.
ते पुढे म्हणाले, ‘दलित, पीडित, शोषितांची सेवा करणे हेच माझ्यादृष्टीने खरे राजकारण आहे. पूर्वी सायकल रिक्षा ओढणारे बहुतांश लोक मुस्लीम किंवा दलित समाजातील होते. त्यांच्यासाठी ई-रिक्षा आणली आणि माणसाने माणसाला ओढण्याची वेदनादायी परंपरा बंद झाली. आज नागपुरातील दलित समाजापुढे सिकलसेल आणि थॅलेसिमियाचे संकट उभे ठाकले आहे. त्यांना स्वस्तामध्ये उत्तम उपचार मिळावा यासाठी एम्स, मेयो आणि मेडिकलमध्ये यंत्रणा तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी ५० मुलांचे बोन मॅरोचे अॉपरेशन मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये केले. त्यांचे प्राण वाचले. कोरोनाच्या काळात शंभर कोटींचे साहित्य वितरित केले. रेमडेसिवीर तयार करण्याची व्यवस्था केली. अनेकांना दृष्टी दोष होऊ लागला होता. त्यांच्यासाठीही उपचाराची व्यवस्था केली. नागपुरातील १ लाख १३ हजार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना साहित्य वितरित केले. दिव्यांगांसाठी उत्तम असा पार्क पूर्व नागपुरात तयार झाला आहे. हे करताना मी कधीही जात-पात-धर्म, पक्षाचा विचार केला नाही.’ केवळ मिहानमध्ये ६८ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि ४५ हजार लोकांना अप्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या. एमआयडीसी, मेट्रोमध्येही शेकडो तरुणांना नोकऱ्या लागल्या. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नागपुरातील ७५ टक्के भागात चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये संपूर्ण नागपूरला ही सुविधा मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपूर शहराला सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून जगात नावलौकिक प्राप्त करून द्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
दीक्षाभूमीच्या कामाची संधी
गेली दहा वर्षे नागपूरचा खासदार म्हणून काम करीत आहे. आतापर्यंत १ लाख कोटींची कामे झालीत. या परिसराला लागून असलेला रिंगरोड साडेचारशे कोटी रुपये खर्च करून केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) पूर्ण केला. रस्ते झाले, उड्डाणपूल झाले, बगिचे, मैदाने झालीत. पण ताजुद्दीन बाबांचे ताजबाग आणि दीक्षाभूमीचे काम करण्याची संधी मला मिळाली, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. ही दोन कामे माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहेत, अशा भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्या.
२२ हजार कोटींचे ‘बुद्ध सर्किट’
मी गौतम बुद्धांचे चरित्र आणि शिकवण समजून घेतली आहे. त्यांचे आचार, विचार, तत्व अभ्यासले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांनी ज्ञान प्राप्त झाले, जिथे वास्तव्य होते आणि जिथे त्यांचे देहावसान झाले, या सर्व स्थळांना मी २२ हजार कोटी रुपये खर्च करून चारपदरी काँक्रिट रोडने जोडले आणि बुद्ध सर्किट तयार केले. जगभरातील पर्यटकांची आणि अनुयायांची सोय झाली, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला.
दोन तास ड्रॅगन टेम्पलमध्ये घालवायचे आहेत
माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकारामुळे कामठी येथे अतिशय सुंदर असे ड्रॅगन टेम्पल निर्माण झाले. जागतिक दर्जाची ही वास्तू मला फार आवडते. एकदा कुणालाही न सांगता दोन तास ड्रॅगन टेम्पलमधील शांततेत मला घालवायचे आहेत, अशी इच्छा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.