- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सॅनिटरी वेस्ट’ संदर्भात जनजागृती करा – अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे आवाहन

सॅनिटरी वेस्टच्या जनजागृतीसाठी महिलांची लाल रंगाच्या पोशाखासह जनजागृती

नागपूर समाचार : सॅनिटरी कचरा आरोग्यासह पर्यावरणासाठी देखील घातक आहे, सॅनिटरी कचरा वर्षानुवर्षे तशाच स्थितीत राहतो, पर्यावरण संवर्धनासाठी ‘सॅनिटरी वेस्ट’चे योग्य विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, यासंदर्भात सर्वांनी मिळून जनजागृती करायला हवी असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले. 

नागपूर महानगरपालिका द्वारा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात रविवारी (ता.३१) रोजी मनपा मुख्यालय ते झीरो माईल फ्रीडम पार्क दरम्यान “सॅनिटरी वेस्ट” संदर्भात लाल रंगाचे पोषाख परिधान करून जनजागृती रॅली काढण्यात आली. झीरो माईल फ्रीडम पार्क येथे आयोजित कार्यक्रमात श्रीमती आंचल गोयल मार्गदर्शनपर बोलत होत्या. 

याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, समाज कल्याण अधिकारी तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महाल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार डॉ. विजय जोशी, समाजसेविका श्रीमती आंचल वर्मा, तेजस्विनी महिला मंचच्या श्रीमती किरण मुंदडा, ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे संस्थापक व स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड ॲम्बेसेडर श्री. कस्तुभ चॅटर्जी, कु, सुरभी जैस्वाल, श्रीमती संगीता रामटेके, यांच्यासह सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी, महिला सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, स्वयंसहायता महिला गटांचे प्रतिनिधी, आशा-अंगणवाडी सेविका, मनपाच्या एमएके आझाद कनिष्ठ महाविद्यालय आणि ताजबाग कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी स्वीप अंतर्गत महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती देखील करण्यात आली.

श्रीमती आंचल गोयल यांनी मार्गदर्शनपर सांगितले की, सॅनिटरी कचऱ्याचे योग्य रित्या विलगीकरण करायला हवे, सॅनिटरी कचरा इतर कचऱ्यात मिसळू नका, सॅनिटरी कचरा कागदात गुंडाळा, लाल बिंदूने चिम्हांकित करा. विल्हेवाट लावण्यासाठी लाल कचऱ्याचा डबा वापरावा असे आवाहनही श्रीमती गोयल यांनी केले. रॅलीची सुरुवात सिव्हिल लाईन्स स्थित मनपा मुख्यालयातून झाली “सॅनिटरी वेस्ट” संदर्भात जनजागृती फलक हाती घेत शेकडो महिला रॅली मध्ये सहभागी झाल्या, रॅली विधान भवन चौक होत संविधान चौक मार्गे झीरो माईल चौक होत झीरो माईल फ्रीडम पार्क येथे पोहोचली झीरो माईल फ्रीडम पार्क येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी “सॅनिटरी वेस्ट” संदर्भात पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच उपायुक्त श्री. प्रकाश वराडे यांनी उपस्थितांना स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती प्रतिज्ञा दिली.

लाल रंगाचे पोषाख विशेष आकर्षण

“सॅनिटरी वेस्ट” संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता शेकडो महिला लाल रंगाचे पोषाख परिधान करून रॅली मध्ये सहभागी झाल्या. लाल रंगाचे पोषाख हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *