केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग
नागपूर समाचार : कुठे भव्य क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून, तर कुठे दिमाखात चालत आलेल्या घोडेस्वारांच्या हस्ते पुष्पवर्षाव करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये अनोखे स्वागत झाले. या यात्रेमध्ये ना. श्री. गडकरी यांच्यासह निवडणूक प्रचार रथावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती.
अजनी मेट्रो स्टेशनपासून यात्रेला प्रारंभ झाला आणि त्यानंतर प्रशांतनगर, गजानननगर या मार्गाने कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीसह छत्रपतीनगरच्या दिशेने यात्रा पुढे गेली. यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी आमदार आशीष देशमुख, माजी महापौर संदीप जोशी, भाजप नेते मुन्ना यादव, माजी नगरसेवक संदीप गवई आदींची उपस्थिती होती. अजनी मेट्रो स्टेशन, प्रशांतनगर (चुनाभट्टी) आणि गजानननगर येथे ना. श्री. गडकरी यांचे जोरदार स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करून यात्रेचे स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून ना. श्री. गडकरी यांचे औक्षण केले, पुष्पहार घातले आणि निवडणुकीतील दमदार विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
एका तरुणाने ना. श्री. गडकरी यांचे पेन्सिल स्केच तयार केले आणि ती भेट स्वरूपात देऊन स्वागत केले. एका तरुणीने कागदापासून तयार केलेले कमळ ना. श्री. गडकरी आणि ना. श्री. फडणवीस यांना भेट दिले. जयताळा मार्गावर काही तरुण घोड्यावर स्वार होऊन आले आणि रथाजवळ येऊन ना. श्री. गडकरी यांच्यावर पुष्पवर्षाव केला. रॅलीच्या मार्गावर असलेल्या शाळांमधील चिमुकल्यांनी देखील उत्साहाने ना. श्री. गडकरी यांचे अभिवादन केले. अनेक वस्त्यांमधील जुने तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते ना. श्री. गडकरी यांच्या स्वागतासाठी उत्साहाने पुढे आले. लक्ष्मीनगर येथील आठरस्ता चौकात यात्रेचा समारोप झाला.
लोकसंवाद यात्रा आज दक्षिण नागपुरात
ना. श्री. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा उद्या (बुधवार) दक्षिण नागपुरात पोहोचणार आहे. राजाबाक्षा मंदिर येथून यात्रा प्रारंभ होईल. त्यानंतर रामबाग, मेडिकल चौक, वंजारी नगर, तुलसी हॉटेल, चंद्रमणी नगर, अजनी पोलीस स्टेशन, राजकमल चौक, सिद्धेश्वर हॉल, मानेवाडाच्या दिशेने कुदरत पान मंदिर, बजरंग नगर, आंबेडकर कॉलेज, कैलाश नगर, बालाजी नगर, रिंग रोड, मानेवाडा चौक, बहरम मंदिर, ओंकार नगर मेन रोड, सह्याद्री लॉन, परिवर्तन चौक, विज्ञान नगर, पिपला रोड, विनायक नगर, न्यू नरसाळा रोड, सूर्योदय नगर पूल, शुभम लॉन, सर्वश्री नगर, टेलिफोन नगर, दिघोरी घाट, शिव गजानन नगर, महावीर नगर या मार्गाने प्रगती हॉल येथे यात्रेचा समारोप होईल.