स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
नागपूर समाचार : भारत देशाची संस्कृती, परंपरा, इतिहास हा खुप समृद्ध आहे. परदेशी आक्रमणांमुळे मधल्या काळात तो झाकोळला गेला. पण परत एकदा आपला देश विश्वगुरू होण्याच्या वाटेवर आहे. प्रत्येक धर्मासाठी स्थान असलेल्या या देशाने सर्वांना एकत्र येऊन जगण्याचा संदेश दिला आहे. अध्यात्म हीच शक्ती असलेल्या या देशाचा युवा पिढीने सखोल अभ्यास करावा व देशाचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, लेखक, जागतिक वक्ते पद्मभूषण श्री एम यांनी केले.
विद्यार्थी व युवकांचे प्रेरणास्थान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी ‘भारत की संकल्पना’ या विषयावर जागतिक वक्ते पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव अजय संचेती व संयोजक जयंत पाठक यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती.
‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या गीताचा उल्लेख करताना श्री एम म्हणाले, आपला देश वंदनीय असून स्वामी विवंकानंदांनी विदेशात जगाला भारताची महती सांगितली. तेव्हाच भारताची विश्वगुरू होण्याची प्रक्रिया परत एकदा सुरू झाली होती. संस्कृत भाषेत या देशाचे मूळ असून प्रत्येक राज्याने, विद्यापीठाने या भाषेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रत्येक घरात मुलांना संस्कृत शिकवले गेल्यास आपल्या देशाचा इतिहास युवा पिढीला कळेल. त्यासाठी मातृशक्तीने प्रयत्न करायला हवे. ही शक्ती एकवटली आणि दत्ताजी डिडोळकर यांच्यासारखे समर्पित देशसेवक तयार झाले आणि प्रत्येकाने आत्ममोक्ष व जगतहिताचा विचार केला तर आपले राष्ट्र निश्चितपणे महान होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सुनील आंबेकर यांनी दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, राष्ट्र एक आहे, ते एकच राहिले पाहिजे. हा भाव युवावस्थेत सहजपणे हृदयात स्थापित झाल्यास चांगले व्यक्तित्व घडते. समर्पित वृत्तीने देशसेवा करणारे दत्ताजी डिडोळकर यांचे जीवन असेच होते.
प्रास्ताविक अजय संचेती यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मेधा कानेटकर यांनी केले. आभार प्रदर्शन जयंत पाठक यांनी केले. नेहा मुंजे यांनी वैयक्तिक गीत सादर केले.
दत्ताजींचे जीवन राष्ट्रसमर्पित – नितीन गडकरी
दत्ताजी डिडोळकर यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले. साधेपणा, नम्रता, निकटता हे त्यांचे विशेष गुण होते. ते आदर्श कार्यकर्ता, समर्पित व्यक्ती आणि उत्तम स्वयंसेवक होते. त्यांचे कार्य, कर्तृत्व, व्यक्तित्व भावी पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. देश सुखी, समृद्ध, संपन्न व्हावा असे दत्ताजींचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करीत आहेत, असे ते म्हणाले.