विविध भागांमध्ये जाहीर सभांचे आयोजन
नागपूर समाचार : राजकारण म्हणजे सत्ताकारण नसून सेवाकारण आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी लोकसेवेला प्राधान्य दिले. ४० ते ४५ हजार लोकांचे हार्ट अॉपरेशन्स करून दिलेत. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत मागायला येणाऱ्याला जात-पात-धर्म-पक्षाच्या पलीकडे जाऊन सहकार्य केले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले.
सिरसपेठ येथील सुदर्शन समाज भवन, कळमना येथील नासुप्रचे मैदान आणि लालगंज झाडे चौक येथे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, नरेंद्र बोरकर, श्री. आगलावे, श्रीमती नांदूरकर, गिरीश देशमुख आदींची उपस्थिती होती.
‘नागनदीसाठी २४०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा प्रकल्प करताना नागनदीच्या काठावरील कुठल्याही गरिबाचे नुकसान होणार नाही,’ अशी ग्वाही ना. श्री. गडकरी यांनी दिली. ‘नागपूरला एज्युकेशन हब म्हणून ओळख मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात येथील तरुणांना भारताच्याच दुसऱ्या शहरांमध्ये नाही तर जगात कुठेही शिकायला जाण्याची गरज पडणार नाही. मिहानमध्ये आघाडीच्या कंपन्या आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आणि भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे,’ याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि सवलती मिळायला पाहिजे, चोवीस तास पाणी मिळायला पाहिजे, हेच माझ्ये उद्दिष्ट्य आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
‘कळमन्याचा विकास होणार’
मी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना कामठी-कळमना रस्ता बीओटीवर पूर्ण केला. उद्घाटनाला शेतकऱ्यांना बोलावले आणि शेतकऱ्यांना शेती न विकण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझा सल्ला ऐकला आणि त्याचा त्यांना फायदा झाला, याचा ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला. या परिसराचा खूप विकास झाला. इथे चांगले रस्ते, वीज आणि पाण्याची सोय केली आणि सर्वसामान्यांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला. इथे येण्यासाठी मोठा पूल निर्माण होणार आहे आणि खालचा रस्ता पूर्णपणे काँक्रिटचा होणार आहे, असेही ते म्हणाले. या भागात स्वस्त दरात घरे उपलब्ध व्हावी आणि येथील तरुणांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.