नागपूर समाचार : ‘नितीन आगे बढो… हम तुम्हारे साथ है’, ‘कहो दिल से… नितीनजी फिर से’, ‘अब की बार चारसौ पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ यासारख्या समर्थनाच्या घोषणांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची पश्चिम नागपूरची लोकसंवाद यात्रा गाजली.
फुटाळा येथील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ना. श्री. गडकरी यांनी यात्रेला प्रारंभ केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर माया इवनाते, माजी महापौर संदीप जोशी, माजी नगरसेविका अश्विनी जिचकार आदींची उपस्थिती होती. फुटाळा येथून भरत नगर, पश्चिम नागपूर भाजप कार्यालय, बागडी निवास या मार्गाने पांढराबोडीमध्ये यात्रेने प्रवेश केला. याठिकाणी स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत ना. श्री. गडकरी यांचे स्वागत केले.
त्यानंतर पांढराबोडी पोलीस चौकी, इंदिरा गांधी रुग्णालय, डागा ले-आऊट, भगवती हॉस्पिटल, शंकरनगर बगिचा, शंकरनगर चौक याठिकाणी देखील आतषबाजी व फुलांचा वर्षाव करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. शिवाजीनगर बगीचा, गोकुळपेठ मार्केट, कॉफी हाऊस चौक, अलंकार टॉकीज चौक, लेंड्रा पार्क या मार्गाने धंतोली भाजप कार्यालयापुढे यात्रा पोहोचली. भाजप कार्यालयापुढे लोकसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुन्ना छालानी हे बग्गीवर सवारी करीत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. लोहापूल मानस चौक, व्हेरायटी चौक, माहेश्वरी भवन या मार्गाने मुंडा देवल महादेव मंदिर येथे यात्रेचा समारोप झाला.
‘नितीनजी सेल्फी प्लीज’
पश्चिम नागपुरातील लोकसंवाद यात्रेत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते बाईकवर सहभागी झाले होते. त्याचवेळी परिसरातील वसतीगृहे, महाविद्यालये, शिकवणी वर्गातील तरुण ना. श्री. नितीन गडकरी यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होते. काही तरुणांनी तर ‘नितीनजी सेल्फी प्लीज’ असा आवाज देऊन गर्दीतही आपली इच्छा पूर्ण करून घेतली.