‘हज यात्रा’ सुविधा संबंधी आढावा
नागपूर समाचार : हज यात्रेसाठी नागपूर येथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरुंना प्राधान्याने आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना सोपविलेली जबाबदारी वेळेत व चोखपणे पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली‘हज यात्रा २०२४’ सुविधा संबंधी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी,महाराष्ट्र राज्य हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, विमानतळ प्रशासन, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेसाठी दिनांक २६ मे ते ९ जून २०२४ दरम्यान महाराष्ट्र ,छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरु प्रस्थान करणार आहेत. तर दिनांक १ ते २१ जुलै २०२४ दरम्यान यात्रेकरु हज यात्रेवरुन परतणार आहेत. या दरम्यान यात्रेकरुंची शहरातील ‘हज हाऊस’ येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
‘हज हाऊस’ येथे यात्रेकरुंसाठी उभारण्यात येणारे विविध मदत कक्ष, विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधा तसेच विमानतळावरील मदत कक्षांच्या तयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. यात्रेकरुंचा ‘हज हाऊस’ येथील वास्तव्य तसेच विमानतळ परिसरातील व्यवस्था याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी पुरवावयाच्या सुविधा व व्यवस्थेबाबत गतीने कार्य करावे व उत्तमोत्तम सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्या,अशा सूचना यावेळी श्रीमती बिदरी यांनी दिल्या.