◾महायुतीमध्ये आणखी एका मित्रपक्षाची भाजपला साथ
◾बावनकुळे यांची नाशिक येथे भेट घेऊन दिला पाठिंबा
नाशिक समाचार : लोकनेते स्व. विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. नाशिक येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल्यामुळे रामहरी मेटे भाजपसोबत आले आहेत.
जय शिवसंग्रामने जारी केलेल्या जाहीर पाठिंबा पत्रामधून भाजपा महायुतीने मराठा समाजाला टिकणारे आरक्षणासह समाजहिताचे निर्णय घेतले असा उल्लेख केला असून स्व. विनायकराव मेटे यांनी अखेरपर्यंत युतीधर्म पाळत भाजपासोबत एकनिष्ठ राहिले. स्व.विनायकराव मेटे आणि मराठा भूषण अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन जय शिवसंग्राम संघटना कार्य पुढे चालवित आहे, असे नमूद करून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रामहरी मेटे यांच्यासह सर्व शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून त्यांचे महायुतीमध्ये स्वागत केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच महायुतीच्या विकासाच्या अजेंड्यावर जय शिवसंग्रामने विश्वास दाखविला असल्याचे श्री बावनकुळे म्हणाले.
भाजपा व जय शिवसंग्राम यांच्यातील समन्वयासाठी आमदार श्रीकांत भारतीय व अमित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जय शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेट्ये पाटील, सरचिटणीस दीपक कदम यांच्यासह जय शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.