- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : उष्माघात संदर्भातील दीर्घकालीन उपाययोजना बाबत कार्यवाहीवर भर द्या – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे निर्देश

नागपूर समाचार :- उष्माघात प्रतिबंधासंदर्भात तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांची देखील आवश्यकता आहे. वाढत्या तापमानाच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासंदर्भात कार्यवाहीवर भर द्या, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.

मनपा मुख्यालयात गुरूवारी (ता.१६) अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. आयुक्त सभाकक्षामध्ये झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त (समाज कल्याण) डॉ. रंजना लाडे, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर, सहायक पोलिस आयुक्त विशेष शाखा नितीन जगताप, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रगती भोळे, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. आशिष राणा, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, नरेंद्र बावनकर, घनश्याम पंधरे, गणेश राठोड, हरीश राउत, व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर, अग्निशमन विभागाचे तुषार बाराहाते, डागा रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नवखरे, ईएसआयएस हॉस्पिटलचे डॉ. एच.डी. कांबळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात उष्माघात प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु आहे.

बैठकीत साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये नागपूर शहरात १६ दिवस तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले. नागपूर महानगरपालिकेद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. शहरातील मेडिकल, मेयो तसेच मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशल हॉस्पिटल आणि पाचपावली रुग्णालयासह ईएसआयएस रुणालय, आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कोल्ड वार्ड तयार करण्यात आले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला. याशिवाय शहरातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आल्या. समाजविकास विभागाद्वारे बेघर व्यक्तींची निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. मनपाचे १६३ उद्याने दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्यात आलीत. ३५०च्या वर ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. वाहतूक पोलिस विभागाद्वारे दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवण्यात आले. १०८ क्रमांकाच्या ११ आणि मनपाच्या ७ रुग्णवाहिका २४ तास तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत. आदी सर्व माहिती डॉ. नवखरे यांनी सादर केली.

वाढत्या उन्हापासून मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना या तात्पुरत्या स्वरूपात प्रभावीपणे कार्य करीत आहेत. मनपाच्या या उपाययोजनांमुळे अनेक नागरिकांना दिलासा देखील मिळतो आहे. मात्र झपाट्याने होत असलेले वातावरणातील बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम लक्षात घेता उष्माघाताच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी व्यक्त केले. यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. तेलंगणाच्या धर्तीवर नागपूरमध्येही ‘कूल रूफ’चे धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही गोयल म्हणाल्या. व्हीएनआयटीच्या प्रा. राजश्री कोठाळकर यांनी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अनेक सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *