नागपूर समाचार : आयुष्यात घर व इतर मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जे कष्ट घेतो त्याची जाणिव पुढच्या पिढीला असेलच याची शाश्वती देता येत नाही. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पध्दतीमुळे एरवी जो एकसंघपणा होता त्यालाही हादरे बसले असून ज्येष्ठांची अधिकाधिक कुचंबनाही संपत्तीच्या कारणामुळे होत असल्याचे निर्दशनास आले आहे. ही बाब लक्षात घेता ज्या कष्टातून आपण आपल्या आयुष्यासाठी तजवीज करुन ठेवली आहे त्याच्या जपणूकीसाठी ज्येष्ठांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी केले.
जागतिक वृध्द शोषण जागृती दिनाच्या पूर्व संध्येला हेल्पेज इंडियाने बचत भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक कौंसिल नागपूरचे अध्यक्ष मनोहर खर्चे, हुकूमचंद मिश्रीकोटकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सुरेश रेवतकर, ॲङ नामदेव फटिंग, रमेश सातपूते, हेल्पेज इंडियाचे हेमंत दानव आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी या त्यांनी जमविलेल्या प्रॉपर्टीची परस्पर विक्री व फसवणूक याबाबत वाढल्या आहेत ही वस्तुस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी यावेळी सांगितली. वृद्ध छळ प्रतिबंध याबाबत जागरुकता केल्यास याचा लाभ पुढील वृद्ध पिढीस होईल व चळवळ सार्थकी लागेल असा विश्वास मनोहर खर्चे यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांचा वृध्दापकाळ अधिक सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य घटनेतील निदेशक तत्वाप्रमाणे सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. यानूसार आरोग्याच्या सुविधेपासून सुरक्षिततेपर्यंत विविध योजना व खबरदारी शासनाने घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवीतांचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गृह विभाग कटिबध्द असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले. ज्येष्ठांनी स्वत:च्या आरोग्यावर अधिक लक्ष देऊन काळजी घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हेल्पेज इंडियाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक कौंसिल नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर यांनी तर हेल्पेज इंडियाचे हेमंत दानव यांनी उपस्थितांचे आभार मानले.