- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सामाजिक न्यायाचे समानतेचे तत्व समाजात रुजविण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले – डॉ. सिद्धार्थ गायकवाड

समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिनाचे आयोजन

नागपूर समाचार : वंचित, शोषित, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजातील घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून न्याय देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले. सामाजिक न्यायाचे समानतेचे तत्व खऱ्या अर्थाने समाजात रुजविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त मंगेश वानखडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी आशा कवाडे, , सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग राजेंद्र भूजाडे उपस्थित होते.

समाजातील शोषित, वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे हे शाहू महाराजांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजनाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहे काढली. खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या प्रतिनिधीक स्वरुपात पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थींना ओळखपत्राचे वाटप केले. शासकीय वसतिगृहात शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या आयोजक सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले. सूत्रसंचालन शीतल गिते यांनी केले तर आभार प्रफुल गोहते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *