- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : स्व. अरविंद खांडेकर यांची वैचारिक चळवळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

श्रद्धांजली सभेत दिला आठवणींना उजाळा

नागपूर समाचार :- स्व. प्रा. अरविंद खांडेकर यांनी शैक्षणिक कार्यासोबतच विद्यार्थी परिषदेच्या संघटन कार्यालाही प्राधान्य दिले. मराठी विषयाचे एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांची वैचारिक चळवळ अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होती आणि भविष्यातही प्रेरणादायी ठरणार आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ लेखक स्व. प्रा. अरविंद उपाख्य बल्लूजी खांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सीताबर्डी येथील सेवासदन संस्थेच्या सभागृहात या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवासदन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बापू भागवत, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, विनया काशीकर, प्रकाश एदलाबादकर यांची प्रमुख उपस्थित होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘बल्लूजींनी अत्यंत कठीण परिस्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन कार्य सुरू ठेवले. अखेरपर्यंत त्यांनी हे कार्य निःस्वार्थ हेतूने केले. विद्यार्थी परिषदेचे संघटन कार्य करताना कार्यकर्त्यांवर त्यांनी चांगले संस्कार केले.

उत्तम विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले.’ बल्लूजींसोबत गप्पा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी स्व. प्रा. अरविंद उपाख्य बल्लूजी खांडेकर यांना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *