विदर्भातील भाविकांची सोय : नागपूर, अमरावती, खामगावमधून सुटणार गाड्या
नागपूर समाचार :- केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची मोठी सोय झाली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदा बुधवार, १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे १२ जुलैनंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असणार आहे. परंतु, पंढरपूरला जाणाऱ्या मोजक्या रेल्वे गाड्या असल्यामुळे अनेकांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता होती. या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू व्हायला हव्यात, अशी विदर्भातील भाविकांची मागणी होती. याचाच विचार करून ना. श्री. गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली.
‘विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आषाढीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. भाविकांची संख्या बघता विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची आवश्यकता आहे,’ असे ना. श्री. गडकरी यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर अगदी काहीच दिवसांत यासंदर्भात निर्णय घेऊन रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विदर्भातील विठ्ठलभक्तांसाठी तातडीने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ना. गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
१४ जुलैपासून धावणार गाड्या
नागपूर, अमरावती व खामगाव अशा तीन ठिकाणांहून या गाड्या सुटणार आहेत. नागपूर येथून १४ व १५ जुलै, अमरावती येथून १३ व १६ जुलै तर खामगाव येथून १४ व १७ जुलैला या गाड्या सुटणार आहेत. या तिन्ही गाड्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधून जाणार आहेत, हे महत्त्वाचे. याशिवाय १८ व १९ जुलैला मिरज ते नागपूर अश्या परतीच्या मार्गावरील गाड्या धावणार आहेत.