- Breaking News, नागपुर समाचार

महानगर पालिकेत ध्वजवंदन उत्साहात : कोरोनायोद्धांचा सत्कार

सर्व मिळून कोरोनाविरुद्ध एकत्रित लढा देऊया : महापौर संदीप जोशी

नागपुर : कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. कधीपर्यंत राहणार हे सांगता येत नाही. त्यामुळे या विषाणूच्या गडद छायेतच आपल्याला जगण्याची सवय करायची आहे. हा लढा कुण्या एकट्याचा नाही. त्यामुळे यापुढे सर्वांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत एकत्रितपणे लढा देऊन कोरोनावर मात करू, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजवंदनानंतर आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त तुकाराम मुंढे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागपूर शहराच्या विकासात लोकसहभाग वाढावा या उद्देशातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यातून पुढे आलेल्या नागरिकांच्या सूचनांच्या आधारे विकासकामांचा आढावा तयार करण्यात आला. महापौर निधीतून शहरभरात सुलभ शौचालय उभारण्याचा संकल्प केला. मात्र याच काळात कोरोनाचे संकट समोर उभे राहिले आणि विकासकामांना ब्रेक लागला. जीव वाचविणे ही प्राथमिकता झाली. मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, मेयो, मेडिकल, पोलिस, जिल्हा प्रशासन यांनी या काळात केलेले आणि करीत असलेले कार्य इतिहासात नोंद व्हावे असेच आहे, असे म्हणत त्यांनी या सर्व योद्धांना मानाचा मुजरा केला.

तत्पूर्वी महापौर संदीप जोशी यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या परेडचे निरीक्षण केले. नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे,, उपायुक्त निर्भय जैन, सुभाष जयदेव, डॉ. प्रदीप दासरवार, अमोल चोरपगार, सहायक आयुक्त महेश धामेचा, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्वेता बॅनर्जी, नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व झोन सहायक आयुक्त, विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनएसएसडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपायुक्त महेश मोरोणे यांनी केले.

आशा वर्कर्सचे मानधन वाढावे…

कोरोनाकाळातील कार्यात आशा वर्कर्सचे कार्य दखल घेण्याजोगे आहे. आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून तळागाळात जाऊन, स्वतःचा जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंज्या मानधनावर त्या आजही कार्य करीत आहे. त्यांचे मानधन डिसेंबर महिन्यापर्यंत एक हजार रुपयांनी वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

कोरोना योद्धांचा सत्कार…

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांचा यावेळी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, आयुक्त तुकाराम मुंढे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या योद्धांमध्ये डॉ. मिनाक्षी सिंग, डॉ. स्वाती गुप्ता, डॉ. विजय जोशी, डॉ. बालाजी मंगम, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू, डॉ. मिनाक्षी माने, डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. दानिश इकबाल, डॉ. शीतल गोविंदवार, डॉ. टिकेश बिसेन, सुकेशिनी मून, जया कांबळे, छाया मेश्राम, अंकिता बरडे, वर्षा चव्हाण, सोहेल अली, राहुल निनावे, ईश्वर चहांदे, आकाशचंद्र समुद्रे, संदीप बनसोड, शेखर रामटेके, महेंद्र वानखेडे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *