- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना समाज विसरत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्रीराम पवार यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ प्रदान

नागपूर समाचार :- ज्यांच्यामुळे समाजावर गुणात्मक परिणाम होतो, त्यांची कायम आठवण ठेवली जाते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना समाज कधीही विसरत नसतो. श्रीराम पवार यांनी अत्यंत प्रामाणिक आणि व्यासंगी पत्रकारिता केली आहे. त्यामुळे त्यांचे पत्रकारितेतील योगदान नक्कीच पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सी. मो. झाडे फाउंडेशनच्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह, 1 लक्ष रोख आणि ग्रामगीता असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, पत्रकार विकास झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘श्रीराम पवार यांना 30 वर्षांपासून ओळखतो. मी प्रदेशाध्यक्ष असताना नाशिक मध्ये भेटायला गेलो होतो. तत्त्वनिष्ठा पत्रकारिता केली. सामाजिक जाणीव ठेऊन लेखन केले. समाजाचे हित बघून लिहिले.’

लोकमान्यतेची आणि राजकीय पाठबळाची अपेक्षा न ठेवता काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *