नागपूर समाचार : शहर व ग्रामीण भागातील ढाब्यांवर अवैध मद्य सेवन व यासाठी ढाबे चालकांकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अशा ढाब्यांवर मद्य सेवन करुन वाहन चालविणाऱ्यांमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग, अन्न व औषधी प्रशासन, महानगरपालिका, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्वांच्या सहभागातून एक कृती गट स्थापन केला जाईल. त्यांच्या मार्फत यापुढे धडक कारवाई करुन दोषींविरुध्द थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध ढाबे आणि बारवरील कारवाई संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त निमिष गोयल, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरजकुमार रामोड यांच्यासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त जयपूरकर, उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महानगरात काही ठिकाणी अवैध रूफटॉप हॉटेल सुरु असल्याच्या तक्रारीबाबत याबैठकीत चर्चा करण्यात आली. अनेक वेळा हॉटेल/ढाबे यांनी विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक असतात. एका विभागाची परवानगी घेऊन ज्या परवानग्या मिळाल्या नाहीत तेही उद्योग अशा रूफटॉप हॉटेल/ढाब्यांवर सर्रास सुरु असतात. त्यांच्यावर कारवाईसाठी आता हे सर्व विभागांचे संयुक्त पथक अधिक प्रभावी ठरेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. हॉटेल व्यवसायकिांकडे असलेल्या परवानग्या पडताळून पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गेल्या तीन महिन्यात 78 ढाब्यांबर कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.