मनपाच्या संयुक्त चमू द्वारे 5 ऑगस्ट रोजी निवाडा झालेल्या जागा ताब्यात घेण्याचे दिले निर्देश
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता:1) महाल परिसरातील केळीबाग व रामजी पहलवान रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी परिसरातील विविध समस्यांची माहिती आयुक्तांना दिली.
नागपूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त चमूद्वारे येत्या सोमवार 5 ऑगस्ट रोजी रामजी पहलवान मार्गावरील निवाडा झालेल्या जागा ताब्यात घेण्यात यावी असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच आमदार दटके यांनी निदर्शनास आणून दिलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येईल असे देखील आयुक्त चौधरी यांनी आश्वासित केले.
पाहणी दरम्यान गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीराम मुंदडा, मनपा नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता (प्रकल्प) नितीन बाराहाते, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, पुरुषोत्तम फाळके, कनिष्ठ अभियंता प्रवीण कुटांगळे, प्र. झोनल अधिकारी सुरेश खरे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी, रामजी पहलवान मार्गावरील ज्या जागांचा निवाडा झाला आहे, तसेच मनपाने खाजगी वाटाघाटी करून खरेदी केलेल्या जागा भूसंपादन विभाग, झोनचे सहायक आयुक्त, भूमी अभिलेख व नगर रचना विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त चमूद्वारे सोमवार 5 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात यावे असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय पावसाचे पाणी साचू नये म्हणून निर्माणाधीन मार्गाच्या लेवलची तपासणी करावी, केळीबाग मार्गावरील नाल्याच्या पूलाचे काम त्वरित पूर्ण करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
यावेळी मनपा आयुक्त यांनी आमदार प्रवीण दटके यांच्यासह केळीबाग रोड सह रामजी पहलवान मार्गावरील रस्त्याची पाहणी करून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सूचित केले.