- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : गड्डीगोदाम येथील समस्यांची आयुक्तांनी केली पाहणी 

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोन अंतर्गत गड्डीगोदाम येथील नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.१) पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक घरोटे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता सुनील उईके, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे यांच्यासह व्यावसायिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गड्डीगोदाम येथील मटन मार्केटला भेट देउन येथील समस्या जाणून घेतल्या. मटन मार्केटमधील घाण पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांद्वारे करण्यात आली. परिसरात मनपाद्वारे नवीन कत्तलखाना चे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे देखील त्यांनी निरीक्षण केले. मटन मार्केटच्या पाण्याची लाईन जोडलेल्या नाल्याची आयुक्तांनी सविस्तररित्या पाहणी केली. गड्डीगोदाम मटन मार्केट ते कामठी रोड पर्यंत नाल्याचे त्यांनी निरीक्षण केले. नाल्याच्या स्वच्छतेसंदर्भात योग्य कार्यवाही करण्याअनुषंगाने त्यांनी विभागाला निर्देश दिले.

याशिवाय मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधून परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या. गड्डीगोदाम येथील वस्त्यांमध्ये मनपाद्वारे निर्मिती सार्वजनिक शौचालयाची इमारत बंदावस्थेत आहे. ही इमारत पाडून येथे मुलांना खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले.

पावसाळी पाणी आणि सिवर लाईनचे पाईपची सफाई करण्यात अडचण येत असल्यामुळे वस्तीमध्ये पाणी जमा होत असते. यासंदर्भात पूर्ण समाधानाच्या दृष्टीने उपाय शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. परदेशीपुरा आणि मोठा पुरा भागात रेल्वे लाईनच्या लगत नाला वाहत असून नाल्या अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे नाल्याच्या सफाई मध्ये देखील अडचण निर्माण होते. नाल्याची रुंदी वाढविण्यासंदर्भात बाबी तपासून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. चौधरी यांनी नागरिकांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *