- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने”च्या टप्पा-२ आयोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला सर्व विभागांकडून तयारीचा आढावा

* नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश

* ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप

* जिल्ह्यातील ५० हजार लाभार्थी महिला होणार सहभागी

नागपूर समाचार : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले. 

येथील रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या आयोजनाबाबत श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पहिल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचनानुसार अंमलबजावणीबाबत विविध विभागांकडून माहिती देण्यात आली. मुख्य कार्यक्रमस्थळी उचित व्यवस्था व सुरक्षा, या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची आसन व्यवस्था, प्रसार माध्यमांची व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत श्रीमती बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदाऱ्या काटेकोर व वेळेत पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *