नागपूर समाचार : तुटपुंज्या आर्थिक स्त्रोतांमध्ये जीवनाचा गाडा पुढे रेटणाऱ्या महिलांना मोलाचा आधार देणारी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ आता राज्यभर लौकिक मिळवत आहे. याचीच प्रचिती नागपुरातील सदर छावनी भागाच्या रहिवासी रुहअफजा (४०) यांच्या स्वानुभवातून दिसून आली.
होजियरीचा छोटासा व्यवसाय त्या दैनंदिन घरकामासह सांभाळतात. या योजनेची माहिती कळताच त्यांनी अर्ज केला.अशात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला बँक खात्यात ३ हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज मोबाईलवर धडकला. स्वातंत्रदिन आणि रक्षाबंधणाचा सर्वत्र उत्साह असताना बँक खात्यात पैसे जमा झाल्याच्या मेसेजने मी ही आनंदीत झाले आणि या योजनेचा लाभ मिळाल्याने हरकुन गेल्याच्या त्यांच्या भावना बोलक्या ठरल्या.
महिना संपला की घर खर्चासाठी पतीकडे हात पसरताना नाकर्तेपणाची भावना मनात यायची, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या बहिणीला हक्काचे १५०० रूपये महिन्याला मिळणार असल्याने आत्मसन्मान मिळाला. माझा आनंद गगणात मावेना, त्याने मी गलबलून गेले. आता पतिकडे हात पसरावा लागणार नाही आणि स्वत:च घरखर्चही भागवू शकणार हा आत्मविश्वास आला. होजीयरीच्या छोटया व्यवसायाला पुढे घेवून जाण्याची इच्छाही आपसूकच आली. योजनेच्या लाभामुळे आत्मविश्वासाने भरारी घेण्यास मी सज्ज झाले.
माझ्या सारख्या असंख्य महिलांनाही गगण भरारी घेण्याकरिता ही योजना वरदानच ठरेल !, असा विश्वासही रुहअफजा यांनी व्यक्त केला. त्यांच्या चेहऱ्यावर तो ठसठसीतपणे दिसत होता.