चर्मकार समाजातील गुणवंतांचा सत्कार
नागपूर समाचार : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीतूनच कुठल्याही समाजाचा विकास शक्य असतो. शैक्षणिक विकास झाला तर आर्थिक विकासाचा मार्ग खुला होतो. आणि त्याचवेळी सामाजिक स्तरही उंचावतो. त्यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
चर्मकार सेवा संघाच्या वतीने गांधीसागर तलावाजवळील शिक्षक बँकेच्या सभागृहात समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला श्री. भय्यासाहेब बिघाणे, श्री. नरेश बरडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘गेल्या सोळा वर्षांपासून दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता मी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतो. माझ्या आईच्या स्मरणार्थ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुरस्कार देत असतो. चर्मकार समाजातील मुलं चांगले शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झाली पाहिजेत, अशीच त्यामागची भावना आहे.’
‘आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे. समाजाचा विकास झाला पाहिजे, अशी या उपक्रमाच्या मागची संघटनेची भावना आहे. समाजाचा विकास करायचा असेल तर शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास आवश्यक आहे. आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार झाला. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. त्यामुळे समाजबांधवांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघीणीचे दुध म्हटले आहे. शिक्षणाने सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावतो. शिक्षणाच्या माध्यमातून आपण ज्ञान आत्मसात करीत असतो. या ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवायला हवे. आपल्या समाजात चांगले इंजिनियर, डॉक्टर, साहित्यिक, वकील निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. समाजातील नवीन पिढीमध्ये उद्यमशीलता निर्माण करून आपल्या पारंपरिक व्यवसायाला अधिक मोठे करण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
भैय्यासाहेब बिघाणे समर्पित कार्यकर्ते
चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांच्याशी माझे चार दशकांचे ऋणानुबंध आहेत. समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. एक अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य समाज बघतो आहे. संत रविदास महाराजांच्या आशीर्वादाने त्यांचे कार्य अविरत सुरू आहे, याचा आनंद आहे, अशी भावनाही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.