- नागपुर समाचार

नागपुर समाचार : माझ्यासाठी दिव्यांगांची सेवा हीच ईश्वरसेवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आधार संस्थेतर्फे श्रवणयंत्राचे वितरण

नागपूर समाचार : ज्यांना पाय नाहीत त्यांना कृत्रिम पाय लावून देणे, गरजूंना श्रवणयंत्र देणे, ट्रायसिकल देऊन दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविणे ही कामे करताना माझ्या मनाला कमालीचे समाधान प्राप्त होते. माझ्यादृष्टीने दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

आधार संस्था व वेकोलिच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना सॉफ्टमोडसहित श्रवणयंत्र वितरित करण्यात आले. धनवटे कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वेकोलिचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी, एस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय गांधी, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तिकरण केंद्राचे (सीआरसी) संचालक प्रफुल्ल शिंदे, आधार संस्थेचे अध्यक्ष सुमित ताटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात नायरा चचाने, स्वयम महाजन, युग चोरकर, अंजली सहारे, मीनाक्षी बघेल या विद्यार्थ्यांना ना. गडकरी यांच्या हस्ते श्रवणयंत्र देण्यात आले.

ना.गडकरी म्हणाले, ‘आपल्या भागात ४ टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत. प्रत्येकाला ज्या साहित्याची गरज आहे, ते साहित्य देण्याचा माझा प्रयत्न असतो. आतापर्यंत ४० हजार दिव्यांगांना साहित्य वितरित केले आहे. मध्ये एका शिबिरात याच महाविद्यालयाच्या मैदानावर जवळपास ८० दिव्यांगांना कृत्रिम पाय लावून दिले होते. ती मुले बुलेट चालवताना आणि फुटबॉल खेळताना बघून आनंद झाला होता.’ केवळ नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील दिव्यांगांची यादी तयार करा. आपण त्यांना आवश्यक ते साहित्य देऊ, असे आवाहन ना. गडकरी यांनी आयोजकांना केले. कमाल टॉकीज चौकात निर्माणाधीन असलेल्या डायग्नोसीस सेंटरची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या सेंटरमध्ये सर्व सीटी स्कॅन, एमआरआयसह सर्व चाचण्या व पॅथॉलॉजी टेस्ट अत्यल्प दरात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *