शहरात ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थान विभागातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अशात आता नवव्या व दहाव्या दिवसाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपा सज्ज असून, शहरातील २०९ ठिकाणी ४१९ कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजवर हजारो श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांनी मोठया संख्येत मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना यावेळेस केली आहे. तलावांच्या संरक्षणासाठी मनपातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था शहरातील विविध प्रभागात करण्यात आली आहे. यात गांधीसागर तलाव, सोनेगांव तलाव येथे मोठे कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहेत. तर सार्वजनिक गणेश मंडळासाठी कोराडी येथे विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गणेश भक्तांच्या सोयीनुसार शहरात ४१९ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सेट्रिंगचे ३३१ , रबरीचे ३१, खड्डे करून ३२, कॉक्रीटचे ३ आणि फिरते २२ टँक राहणार आहेत.