- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नागपूरकरांचा सुखकर प्रवास; नागपूर-सिकंदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती

नागपूर समाचार :- ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस अतिशय कमी वेळात लोकप्रिय झालेली गाडी आहे. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता नागपूर-सिकंदराबाद गाडीमुळे नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) व्यक्त केला.

ना. नितीन गडकरी व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवली. मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून ही गाडी सिकंदराबादच्या दिशेने रवाना झाली. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील तीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवी झेंडी दाखवली. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे अशा तीन गाड्यांचा समावेश आहे.

ना. गडकरी म्हणाले, ‘नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मोठ्या प्रमाणात मागणी होती. वंदे भारत ही अतिशय कमी वेळात जनतेमध्ये लोकप्रिय झालेली गाडी आहे. आज ही गाडी सुरू होणे जनतेसाठी एक आनंददायी घटना आहे. विशेष म्हणजे एकीकडे नागपुरातील दोन्ही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण सुरू असणे आणि दुसरीकडे वंदे भारत सुरू होणे हा एक उत्तम योगायोग आहे.’

गडकरींसोबत २५ वर्षांचे ऋणानुबंध – राज्यपाल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत माझे २५ वर्षांचे ऋणानुबंध आहेत. ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना मी तामिळनाडूचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वात कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली, या शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘नागपूर हे देशाला जोडणारे शहर आहे. देशाचा मध्यभाग म्हणून या शहरातून दक्षिणेकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणे एक महत्त्वाची घटना आहे. तसेही नागपुरातून दक्षिणेच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढणे आवश्यक होते. एकूणच ट्रेन, विमान, रस्ते या सर्व मार्गांनी आता भारतात सुखद प्रवास होत आहे. त्यादृष्टीने भारत वेगाने प्रगती करत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *