- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आयुर्वेदात ‘मॉडर्न ॲप्रोच’ आवश्यक – ना. श्री. नितीन गडकरी

श्री विश्व व्याख्यानमालेचे उद्घाटन

नागपूर समाचार : येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल आहे. पण गतीने पुढे जायचे असेल तर आयुर्वेदासाठी भविष्याचे व्हिजन तयार करावे लागेल. उपकरणे/यंत्रे तयार करणाऱ्यांसोबत आयुर्वेदाचा समन्वय साधावा लागेल. आयुर्वेदात मॉडर्न ॲप्रोच आणि डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले तर लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला.

श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र आणि श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात श्री विश्व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी विचार मांडले. यावेळी सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भारत सरकारच्या भारतीय चिकित्सा पद्धतीचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, बैद्यनाथचे संचालक सुरेश शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे. संपूर्ण जग आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे. भारतीय समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा हेच याचे मुख्य कारण आहे. आपण पुरातन काळात विकसित केलेल्या विज्ञानाबद्दल जगाला आकर्षण आहे. आयुर्वेदात पंचकर्मासह विविध उपचार तसेच अनेक प्रकारच्या औषधांमुळे असाध्य आजार बरे झाले आहेत. आयुर्वेदाच्या बाबतीत देशात चांगले काम करणाऱ्या संस्था आहेत. पण ज्या पद्धतीने संशोधन व्हायला पाहिजे, त्यात आणखी खूप प्रयत्नांची गरज आहे.’

कुठल्याही रुग्णाला जो आजार असेल त्याचे योग्य निदान खूप महत्त्वाचे असते. रोगाचे निदान होणार नाही तोपर्यंत औषध ठरवता येणार नाही. त्यातही औषधांची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक पॅथीमध्ये चांगले संशोधन सुरू आहे. आयुर्वेदात ज्या थेरेपी विकसित झाल्या आहेत, त्याचा लोकांना फायदा होत आहे,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

आयुर्वेदात कॅन्सर, अस्थमा, पोटाच्या अनेक आजारांवर औषध आहे. त्याचा चांगला परिणाम बघायला मिळत आहे. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. योगविज्ञान आणि आयुर्वेद असो, किंवा कुठलीही उपचार पद्धती असो, त्याचा स्वीकार होण्यास वेळ लागतो. विश्वासार्हता हे सर्वांत मोठे कॅपिटल आहे. ती मिळवण्यासाठी व राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *