- Breaking News

नागपुर समाचार : ज्येष्ठांच्या जीवनातील नकारात्मकता दूर व्हावी – ना. नितीन गडकरी

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे वार्षिक अधिवेशन

नागपूर समाचार : एकाकीपणामुळे ज्येष्ठांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. आपण कुटुंबाला जड झालोय अशी भावना निर्माण होते. त्यांच्या मनातील ही भावना दूर व्हावी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तसेच ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. नितीन गडकरी यांनी (शनिवार) येथे केले.

सक्करदरा येथील तेली समाजाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, राज्यसभा खासदार सुमित्रा वाल्मिकी, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल जैन, माजी आमदार अशोक मानकर, डॉ. संजय उगेमुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मिश्रीकोटकर, खर्चे, बबनराव वानखेडे, रत्नाकर राऊत, विजय लिमये यांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी म्हणाले, ‘तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना सर्वच डिजिटलकडे वळू लागले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा किंवा कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांच्यापर्यंत जलदगतीने पोहोचावे, यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची वेबसाईट तयार व्हावी.’ ‘ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वार्थाने आधार देण्यासाठी सात वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्यसेवा आदींच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’

विविध धार्मिक स्थळी ज्येष्ठांसाठी इलेक्ट्रीक बसने यात्रा सुरू केली आहे. सध्या तीन बसेस असून येणाऱ्या दिवसात आणखी चार बसेस आपल्याला मिळणार आहे. मात्र त्या केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी राहणार आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले. आज आई-वडिलांविषयी प्रेम कमी झाले असून त्यातून वृद्धाश्रमात जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची चिंताही गडकरी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठांसाठी क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जात असून त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे आवाहन गडकरी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *