- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शेतकरी समृद्ध होण्यासाठीच प्रयत्न गरजेचे – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

अॅग्रोव्हिजन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर समाचार : विदर्भातील शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, याच उद्देशाने अॅग्रोव्हिजन प्रदर्शन सुरू करण्यात आले. स्मार्ट व्हिलेजेस निर्माण व्हावीत, शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावे, शेतकऱ्यांचा नफा वाढावा, जोडधंद्यातून रोजगाराची साधने निर्माण व्हावीत, हाच आमचा उद्देश आहे आणि त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.

अॅग्रोव्हिजन समितीच्या वतीने हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये आयोजित कार्यक्रमात ना. श्री. गडकरी बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, श्री. श्रीधर ठाकरे, श्री. डॉ. घोष, श्री. रवी बोरटकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपल्याला संधी कुठे आहे हे शोधले पाहिजे. त्यानंतर यश मिळेल याच दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हवेत. यंदा अॅग्रोव्हिजन १५ व्या वर्षांत पदार्पण करतेय. या पंधरा वर्षांत सर्वांच्या सहकार्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मध्य भारतातील सर्वांत मोठं कृषी प्रदर्शन म्हणून मान्यता मिळवली. या यशात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे.’ 

मी आज भोपाळ दौऱ्यावर होतो. त्यावेळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाला येण्याची इच्छा व्यक्त केली, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मध्यप्रदेशात आपल्या अनेक गोष्टींचे अनुकरण करण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाल्याचे ना. श्री. गडकरींनी सांगितले. 

प्रत्येक जिल्ह्यात हवेत काऊ फार्म

प्रत्येक जिल्ह्यात दोनशे काऊ फार्म तयार होतील यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रकारची मदत करायला मी तयार आहे. फार्मर प्रोड्युस कंपन्या निर्माण केल्या जाव्यात. ते काम सुरु झाले आहे. त्या धरतीवर काऊ फार्म यशस्वी होणे नक्कीच शक्य आहे. त्याचा शेतीला आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो, याचा विश्वास असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *