श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे दिवाळी स्नेहमिलन
नागपूर समाचार : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात बहिणींना मदत करण्यासाठी ‘सोबत’ पालकत्व प्रकल्प पुढे आला. पुढे मुलांचे शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार या क्षेत्रात सहकार्य करून परिवाराला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. ‘सोबत’ची मुठ अशीच घट्ट ठेऊन २७३ परिवारातील बहिणींचे प्रश्न सोडवून त्यांना अधिक सक्षम करू, असा विश्वास श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारे संचालित ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाने जबाबदारी स्वीकारलेल्या २७३ भगिनींच्या परिवाराकरिता सुरेंद्रनगर आरपीटीएस रोड येथील जेरिल लॉनमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत आणि दैनिक नवभारतचे संपादक संजय तिवारी उपस्थित होते. यावेळी प्रणय मोहबंशी, प्रकाश रथकंठीवार, आनंद टोळ यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना संदीप जोशी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात एका बहिणीने मदतीसाठी फोन केला. त्यावेळी त्या बहिणीच्या परिवाराची विदारक परिस्थिती पाहून या संकटाचे बळी ठरलेल्या इतरही बहिणींना मदत करण्याची संकल्पना पुढे आली व त्यातून ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘सोबत’ला समाजातील अनेक सेवाभावी नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे.
‘सोबत’ परिवारातील एका भगिनीची डॉ. साधना देशमुख यांनी नि:शुल्क प्रसूती केली. ‘सोबत’ परिवारातील एका सदस्याची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. परिवारातील पाल्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी दहा हजार रुपयांची मदत करण्यात येते. अनेक भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या हेतूने विविध प्रशिक्षण देण्यात आले. हे कार्य पुढेही असेच सुरु राहील, असा विश्वास श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला. यावेळी संदीप जोशी यांनी भगिनींचा उल्लेख ‘पर्मनंट बहिणी’ असा केला.
दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत यांनी संदीप जोशी यांच्या कार्याचा यावेळी गौरव केला. आध्यात्म आणि सेवा या दोन्हीचा मिलाप संदीप जोशी यांच्या स्वभावात आहे. त्यांच्या कार्यात अभिनव कल्पना असतात. जिथे चांगुलपणा दिसतो तिथे संदीप जोशी उभे असतात असेही ते म्हणाले. भगिनीसोबतच्या ‘दिवाळी मिलन’ ने सामाजिक कार्यातून खरी दिवाळीची सुरुवात झाल्याचेही श्रीपाद अपराजीत म्हणाले. संदीप जोशी यांनी सेवेची नौका उभी केली असून ती वल्हवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू व नागपूरकर म्हणून या सेवेत नेहमी सोबत राहू, असा विश्वासही त्यांनी दिला.
दैनिक नवभारतचे संपादक संजय तिवारी यांनी ‘सोबत’ प्रकल्पाची स्तुती करताना अशा प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातून अनेक संदीप जोशी पुढे यावेत ही अपेक्षा व्यक्त केली. श्री. जोशी यांनी ‘सोबत’च्या माध्यमातून २७३ कुटुंबांना जोडले नसून २७३ विचार जोपासले आहेत, असेही ते म्हणाले. कोरोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील सदस्यांना स्थायी स्वरूपात सक्षम करावे यासाठी पुढील काळात प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना तिवारी यांनी यासाठी शुभेच्छा दिल्या.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पी.एस. म्यूझिकल कराओके ग्रुपद्वारे प्रमोद संतापे यांच्यासह चमूने बहारदार गीतांचे सादरीकरण करण्यात आले. चंद्रकांत रेड्डी यांनी मनोगत व्यक्त करताना उमेदीच्या काळात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संदीप जोशी यांनी ‘सोबत’च्या माध्यमातून मोलाची साथ दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना कुऱ्हेकर यांनी केले. आभार आनंद टोळ यांनी मानले.