- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कॉंग्रेसचा जाहीरनामा फसवा! चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

कॉंग्रेसने योजनांचे बजेट सांगावे

कामठी समाचार : कॉंग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांच्या लागूंलचालनाकरीता कॉंग्रेस खोटारडेपणा करीत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, कॉंग्रेसच्या रक्तात विकास नाही, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी योजनांच्या विरोधात भूमिका घेतली. कॉंग्रेसचे लोकही लाडकी बहिण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. अशा योजना परवडत नाही अशी थेट भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. आता तेच योजनेतून तीन हजार रूपये देणार असे सांगत नवी योजना आणत आहेत, या योजनेसाठी पैसा कसा आणणार हे कॉंग्रेसने जाहीर करावे. दुसरीकडे भाजपा-महायुती आणि केंद्रातील मोदीजींचे डबल इंजिन सरकार असल्याने योजनांचे बजेट तयार आहे. विकासकामांसाठी केंद्र सरकार आणि योजनेसाठी महायुती सरकार पैसा देणार. खरगे यांच्या टीकेचा समाचार घेताना श्री बावनकुळे म्हणाले, कुणाचा पायगुण चांगला हे हरियाणाच्या निकालावरून संपूर्ण देशाने पाहिले. राहुल गांधींचा पायगुण चांगला नाही. देशाच्या विकासासाठी मोदीजी सत्तेत आले म्हणूनच ते युगपुरुष ठरले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजुने 

संघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नसल्याच्या खरगे यांच्या वक्तव्यावर टोला लावला. बावनकुळे म्हणाले, खरगे संघ मुख्यालयात आले नाही, त्यांच्याकडे दुर्बीण आहे का? त्यांनी एकदा संघ कार्यालयात यावे व काय आहे ते प्रत्यक्ष पहावे. मनोज जरांगे यांची मागणी सामाजिक असून सरकार त्यांच्या मागण्यांची जबाबदारी नक्की घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांचा अनुभव मोठा असला तरी महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजुने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेसा-पिपळा भागात प्रचार 

कामठी मतदारसंघातील भाजपा-महायुती उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी बेसा-पिपळा नगर पंचायत क्षेत्रात प्रचार केला. वस्त्यांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत त्यांनी संवाद साधला. कामठी – मौदा विधानसभा मतदारसंघाचे सर्वांगिण विकासासाठी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून संधी देण्याची विनंती केली. नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले व अनेक महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत अजय बोढारे, सुनील कोडे, नरेश भोयर, वैशाली भोयर, प्रभू भेंडे, मुकुल उपासने, सोनाली परमार, धनंजय झाडे, उमेश भोयर, अनिकेत चौधरी, मदन मालव, मिथिलेश राय, निखिल भोयर, किरण बोढारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *