▪️ नागपूर हे संगीत प्रतिभेचे भांडार – शेखर रावजियानी
▪️ अर्णव जुनारकर, नाव्या पानके आणि श्रावणी कांबळे यांनी 7-10 वयोगटात तर श्रावणी खंडाळे, डॉर्फी जनबंधू व ऐश्वर्या बरगट यांनी 11-16 वयोगटात मारली बाजी
नागपुर समाचार : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस), लावा, नागपूर द्वारा आयोजित “ग्लोबल इंडियन स्टार्स” मध्ये गायन प्रकारात अर्णव जुनारकर, नाव्या पानके आणि श्रावणी कांबळे यांनी 7-10 वयोगटात तर श्रावणी खंडाळे, डॉर्फी जनबंधू व ऐश्वर्या बरगट यांनी 11-16 वयोगटात बाजी मारली.
30 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाअंतिम फेरीत दोन श्रेणींमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. 1500 हून अधिक स्पर्धकांपैकी अंतिम फेरीत निवड झालेल्या 20 स्पर्धकांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेतील विजेत्याची निवड प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शेखर रावजियानी यांच्यासह प्रियंका बर्वे व अंबी या कलाकारांच्या पॅनेलद्वारे करण्यात आली. शहराच्या संगीत प्रतिभेबद्दल बोलताना शेखर रावजियानी म्हणाले, “नागपूर हे संगीत प्रतिभेचे भांडार आहे आणि युवकांनी आपल्या अभ्यासासह जीवनाच्या प्रत्येक पैलूत समर्पण आणि समतोल राखणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आवड देखील जोपासली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.”
विजेत्यांना ₹4 लाखांपर्यंतची बक्षिसे, जीआयआयएस नागपूर येथे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती आणि ग्लोबल स्कूल ऑफ म्युझिक अंतर्गत शेखर रावजियानी यांचे मेंटरशिप मिळविण्याची विलक्षण संधी मिळाली.
यावेळी बोलताना ग्लोबल स्कूल्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. अतुल टेभुर्णीकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. “ नागपूर हे माझे मूळ गाव असल्याचा मला अभिमान आहे. हे शहर प्रतिभावान तरुणांनी भरलेले आहे”, असे ते म्हणाले. जीआयआयएस भविष्यात अशा आणखी स्पर्धांचे आयोजन करेल. त्यामुळे नागपूरच्या स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“ग्लोबल इंडियन स्टार्स” स्पर्धेने संगीत प्रतिभा शोधण्यासाठी एक नवा बेंचमार्क सेट केला आहे आणि नागपुरातील यश हे शहरातील तरुण कलाकारांसाठी उज्ज्वल भविष्याचे द्योतक ठरेल.