- Breaking News, Meeting, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : नागपूर शहराच्या सुरक्षित शाश्वत विकासाबाबत भागधारकांनी नोंदविल्या सूचना

‘मल्टी-हॅझर्ड रिस्क व्हल्नरेबिलिटी असेसमेंट’ कार्यशाळा

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्याद्वारे राज्यातील नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर या तीन शहरांचे ‘मल्टी-हॅझर्ड रिस्क व्हल्नरेबिलिटी असेसमेंट’ करण्यात आले. नागपूर शहराचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर शहरातील विकासाचे भागधारक असलेले मनपातील विविध विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची कार्यशाळा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेत सभाकक्षात कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये सुरक्षेच्या विविध जोखीमांबाबत चर्चा करून त्यावर भागधारकांनी आपल्या सूचना नोंदविल्या.

कार्यशाळेमध्ये यूएनडीपीच्या शहर प्रकल्प समन्वयक अरुषा आनंद, आरएमएसआय चे टीम लिडर डॉ. मुरली कृष्णा एम. यांनी सादरीकरण केले. यावेळी मनपाचे उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

नागपूर शहराचे ‘मल्टी-हॅझर्ड रिस्क व्हल्नरेबिलिटी असेसमेंट’ संदर्भात यूएनडीपी द्वारे यापूर्वी दोन कार्यशाळा घेण्यात आलेल्या होत्या. यानंतर अंतिम कार्यशाळा मंगळवारी (ता.३) पार पडली. या कार्यशाळेमध्ये शहरातील आपत्ती जोखीमग्रस्त बाबींवर चर्चा करण्यात आली. भूकंप, उष्माघात, पूर, आग, आरोग्य संकट अशा विविध जोखीमांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरएमएसआय द्वारे शहरातील प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती यावेळी आरएमएसआय चे टीम लिडर डॉ. मुरली कृष्णा एम. यांनी सादर केली. त्यांच्याद्वारे शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील निरीक्षणे यावेळी नोंदविली. नागपूर शहरातील वाढते तापमानाला हवामान बदल या घटकाप्रमाणेच शहराचा विस्तार आणि बांधकाम प्रणाली देखील जबाबदार असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदविण्यात आले. शहरात यापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची आकडेवारी देखील यावेळी सादर करण्यात आली. आधी होणारे पावसाचे प्रमाण आणि आताचे पावसाचे प्रमाण आणि उद्भवणारी परिस्थिती यासाठी कारणीभूत बाबींवर यावेळी चर्चा झाली. नागपुरात भूकंपाचा धोका नसला तरी संभाव्य धोक्याबाबत देखील माहिती देण्यात आली.

शहरात आगीच्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा करताना २०१२ ते २०२३ या कालावधीमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे आगीच्या ६० टक्के घटना घडल्याचे सर्वेक्षणामध्ये निदर्शनात आल्याची माहिती सादर करण्यात आली. यासाठी वाढते तापमान देखील जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रणासाठी ‘आपदा मित्र’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा पुरेसा प्रयत्न करण्यात आला. शहरातील सर्वाधिक पाऊस होणारी संभाव्य जोखीमग्रस्त प्रभाग, उन्हाची तीव्रता जास्त भेडसावणारे प्रभाग या सर्वांची रितसर माहिती यावेळी सादर करण्यात आली. आरएमएसआय द्वारे विविध आपत्तींबाबत शहराच्या संभाव्य जोखीमग्रस्त भागांचे नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. हे नकाशे पुढील सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीस्तव मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी निर्देश दिले.

कार्यशाळेमध्ये डॉ. प्रणीता उमरेडकर, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, कमलेश चव्हाण, सुनील उईके, विजय गुरूबक्षाणी, मनोजकुमार सिंग, संजय माटे, अनील गेडाम, सचिन रक्षमवार, आरएमएसआय चे हायड्रोलॉजिस्ट प्रतुल श्रीवास्तव, सतिश राहाटे आ. व्य. अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *