नागपूर समाचार : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले.
ॲड. मेश्राम यांनी चैत्यभूमी परिसरामध्ये समता परिषद मुंबईच्या वतीने आयोजित भोजन व्यवस्थेला भेट दिली व अनुयायांना भोजन वाटप केले. यावेळी प्रामुख्याने समता परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री भाई गिरकर उपस्थित होते. माजी मंत्री भाई गिरकर यांनी राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांना संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही चतुःसूत्री देतानाच देशाच्या एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचे व्यक्तिगत स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून परिभाषित केले. या संविधानामुळेच १२५ कोटी लोकसंख्येचा देश आज एकसंघ राहून जगाच्या परिप्रेक्षात ज्या गतीने वाटचाल करीत आहे, हा सर्वार्थाने संविधानाचा विजय आहे, असे प्रतिपादन यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.
समता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कांबळे, राहुल कांबळे, अशोक कांबळे, मयुर देवळेकर, माजी नगरसेविका समीता कांबळे, दलित मित्र प्रकाश कांबळे, संजय अडागळे, भाऊ कांबळे, उदय पडेलकर, संजय बाविस्कर, दिनकर पवार, सुभाष धोत्रे, सचिन गमरे, सिद्धार्थ सकपाळ व बरेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.