■ विकासकामांना अधिक गतीने पूर्ण करता येईल – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प नागपुरात साकारत आहेत. यातून रोजगार निर्मितीसह आर्थिक विकासाला मोठे बळ प्राप्त होणार आहे. हे प्रकल्प जलदगतीने प्रत्यक्षात साकारण्यासाठी संबंधित विविध विभागांचा समन्वय व विविध शासकीय जबाबदारी वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरचा अनुभव लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर नागपूर येथेही वॉर रूम केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागांच्या अधिका-यांची एक टीम तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे वॅार रूमसंदर्भात एक व्यापक आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावित विकासकामे व योजनांबाबत संबंधित कार्यान्वयन विभागांना विहित प्रपत्र देण्यात येणार आहेत. त्या-त्या विभागांना त्यानुसार संबंधित प्रकल्पांची माहिती विहित प्रपत्रात भरावी लागणार आहे. या माहितीचा आढावा प्रत्येक टप्प्यांवर घेण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास स्वतंत्र याबाबत पोर्टल विकसित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत जर एनआयसीकडे एखादे पोर्टल वापरता असेल तर त्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. यासाठी निश्चित कार्यपद्धती दोन दिवसांमध्ये ठरविण्यात येऊन ती संबंधित विभागप्रमुखांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.