■ संबंधीत नागरिकांनाही या प्रकल्पांतर्गत अडचणीसाठी साधता येईल संपर्क
नागपूर समाचार : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध प्रकल्पांना गती मिळावी, संभाव्य गुंतवणुकदारांना अडचणी येत असल्यास त्याचे तत्काळ समाधान व्हावे व मिहान अंतर्गत कुणाचे प्रश्न असल्यास त्याचा लवकर निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी तथा एमएडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना संपर्कासाठी वेळा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या कालावधीत ते प्रत्यक्ष मिहान येथील कार्यालयात राहतील. याच बरोबर इतर दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 पर्यंत या प्रकल्पांशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्ती, उद्योजक, संस्था यांना थेट संपर्क साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर कार्यालयीन वेळेत इतर महत्वपूर्ण बैठकात व्यस्त असल्यास कस्टमर केअर, व्हॉटस्ॲप क्रमांक 7498676133 यावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
खापरी येथील एमएडीसी कार्यालय, सेंट्रल फसिलीटी बिल्डींग, मिहान एसईझेड येथे दर शुक्रवारी ते दिलेल्या कायलावधीत नागरिक, उद्योजक, गुतवणुकदारांना भेटतील. एमएडीसी व मिहान अंतर्गत असलेले उपक्रम व यासंदर्भात असलेल्या उपक्रमांबाबत यातून अधिक सुसूत्रता येईल. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यातून साध्य होईल, असे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.