■ मित्र परिवारातर्फे हृदय सत्कार, दक्षने उलगडला ‘आयर्न मॅन’ स्पर्धेचा प्रवास
नागपूर समाचार : ठराविक वेळेत पोहणे, सायकलिंग आणि रनिंग करून निश्चित अंतर पार करण्याची ‘आयर्न मॅन’ ही अतिशय अवघड शर्यत असून दक्ष खंतेने ती वयाच्या अठराव्या वर्षी पूर्ण करून आदर्श प्रस्थापित केला आहे. साहसी क्रीडा प्रकाराचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ असलेला दक्ष युवकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी त्याचे कौतुक केले.
क्रीडा विभाग, मित्र परिवार व प्रेस क्लब नागपूरच्या वतीने पश्चिम ऑस्ट्रेलियातील बसल्टन येथे नुकतीच पार पडलेली अत्यंत प्रतिष्ठेच्या 20 व्या जागतिक पूर्ण अंतराची ‘आयर्न मॅन’ ही शर्यत वयाच्या 18 वर्षी पूर्ण करून जगातील सर्वात तरुण ‘आयर्न मॅन’ ठरलेल्या दक्ष खंतेचा शनिवारी गौरव करण्यात आला. प्रेस क्लब ऑफ नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात शेखर पाटील यांनी त्याला स्मृतिचिन्ह देऊन त्याचा सन्मानित केले. यावेळी मंचावर माहिती व जनसंपर्क विभागाचे माध्यम समन्वयक अनिल गडेकर, दक्ष खंते व स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ नागपूरचे प्रभारी अध्यक्ष अमीत संपत यांच्यासह अमोल खंते व एकता खंते यांचीदेखील उपस्थिती होती.
आईवडिलांचा साहसी क्रीडा प्रकाराचा वारसा दक्ष पुढे चालवत असल्याचे सांगत शेखर पाटील यांनी युवकांना जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर स्पोर्ट्सशिवाय पर्याय नाही, असे उद्गार काढले. पुढील दहा वर्षात स्पोर्टस इंडस्ट्री म्हणून विकसीत होईल आणि 2036 चे ऑलिम्पिक भारतात आयोजित केले जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अमीत संपत यांनी दक्षला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकातून अनिल गडेकर यांनी सत्कार सोहळा आयोजनामागची भूमिका विशद केली. अशा सत्कारांमुळे युवकांना प्रोत्साहन मिळते असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राम ठाकूर यांनी केले.
पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक
दक्षने यावेळी ‘मेकिंग ऑफ आयर्न मॅन’ चा संपूर्ण प्रवास उलगडला. आईवडिलांचे प्रोत्साहन, प्रशिक्षक अमीत समर्थ यांचे मार्गदर्शन, कठोर मेहनत, जबरदस्त इच्छाशक्ती, शारीरिक व मानसिक सुदृढता या बळावर ‘आयर्न मॅन’चे लक्ष वाढदिवसाचे दिवशी पूर्ण करणे शक्य झाल्याचे दक्षने सांगितले. आता पुढील लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे असल्याचे तो म्हणाला.