■ खासदार भजन स्पर्धेचे उद्घाटन
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या खासदार भजन स्पर्धेचे आज (मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५) थाटात उद्घाटन झाले. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस गुरुकुंज मोझरीचे श्री जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी भजन हे समाजजागृतीचे सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन केले.
मध्य नागपूरातील श्री संत कोलबा स्वामी सभागृह येथे खासदार भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन बोथे गुरुजींच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार प्रवीण दटके, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रगती पाटील, माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत आगलावे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
‘भजन हे ईश्वर भक्तीचे आणि लोकजागृतीचे सर्वोत्तम माध्यम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य प्रेरक मानून भजन मंडळातील मातृशक्तींनी राष्ट्रसेवा कार्यात समर्पित व्हावे,’ असे विचार जनार्दनपंत बोथे गुरुजी यांनी मांडले. यावर्षी भजन स्पर्धेत नागपुरातील ५७८ भजनी मंडळांनी आपला सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी मध्य-उत्तर नागपुरातील ८९ भजन मंडळांनी सहभाग घेतला. भजन मंडळींनी एक गवळण गीत, दुसरे गीत जोगवा, गोंधळ सादर केले.
या खासदार भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून आयोजन समितीत अमोल ठाकरे, विश्वनाथ कुंभलकर, रेखा निमजे, सपना सागुळले, श्वेता निकम,श्रद्धा पाठक, सुजाता कथोटे,अनिता काशीकर ,अतुल सागुळले, अभिजित कठाले यशस्वी आयोजनासाठी परीश्रम घेत आहेत.
उद्या, बुधवार दि. ८ जानेवारीला पूर्व विभागाची प्राथमिक फेरी संताजी हॉल छापरू नगर येथे होणार आहे. त्यानंतर गुरुवार दि. ९ जानेवारीला दक्षिण विभागाची प्राथमिक फेरी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उदय नगर रिंग रोड येथे, शुक्रवार दि. १० जानेवारीला दक्षिण पश्चिम विभागाची प्राथमिक फेरी छत्रपती सभागृह, वर्धा रोड येथे आणि शनिवार दि. ११ जानेवारीला पश्चिम विभागाची प्राथमिक फेरी श्रीराम मंदिर, राम नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ही स्पर्धा होईल.