नागपूर समाचार : नायलॉन मांजा व प्लॅस्टिक पतंग विरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजा व प्लॅस्टिक पतंगाची विक्री करणाèया व्यावसायिकांविरोधात मनपाने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. मनपा आयुक्ततथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोन स्तरावर कारवाईला गती देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाद्वारे नायलॉन मांजा व प्लॅस्टिक पतंग विरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईमध्ये 28 नोव्हेंबर 2024 ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये 477 दुकानांची तपासणी, 5 दुकानांवर कारवाई, प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत 30 हजार 500 प्लॅस्टिक पतंग जप्त करण्यात आल्या, अशी माहिती उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिली.
महानगरपालिकेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी विरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. दुकानांची तपासणी करून नायलॉन मांजा आढळल्यास तो साठा जप्त व संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रतिबंधित सिंगल यूज प्लॅस्टिकच्या पतंगविरोधात कारवाई केली जात आहे.
नायलॉन मांजा घातक
स्वत: किंवा घरातील मुलांना पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रवृत्त करू नये. नायलॉन मांजा घातक असल्याचे मुलांना पटवून द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्ततथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.