अपुरा पुरवठा थांबवून स्वच्छ पाणी देण्याचे कठोर निर्देश
अहेरी समाचार : अहेरी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करत, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी जलजीवन प्राधिकरण कार्यालयाला भेट देत कठोर निर्देश दिले.
नागरिकांच्या मागण्यांवर तत्पर प्रतिसाद
भाजपाच्या “घर चलो” सदस्यता अभियानादरम्यान, मा.खा. अशोकजी नेते यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या वेळी अनेकांनी पाणीपुरवठ्यातील समस्या मांडल्या. नागरिकांनी अपुरा पाणीपुरवठा, खंडित सेवा, तसेच कमी दाबाने येणारे दूषित पाणी याबाबत तक्रारी केल्या. भाजप पदाधिकाऱ्यांनीही जलजीवन प्राधिकरणाच्या कार्यक्षमतेबाबत वारंवार होणाऱ्या अडचणींची माहिती दिली.
जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी आणि कार्यवाहीचे निर्देश
या समस्यांवर तातडीने उपाययोजना म्हणून मा.खा. अशोकजी नेते यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. त्यांनी पाहणी दरम्यान, शुद्धीकरण प्रक्रियेअंती देखील गटारासारखे काळे आणि दुर्गंधयुक्त पाणी पाहून संताप व्यक्त केला. अभियंता कोतपल्लीवार यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तातडीने स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा
जलजीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीवर नाराजी व्यक्त करत मा.खा. अशोकजी नेते यांनी सुधारणा न झाल्यास पालकमंत्र्यांमार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा न मिळणे हे गंभीर असून, जनतेच्या आरोग्याशी संबंधित या समस्येकडे दुर्लक्ष होणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
जनतेत समाधान आणि पुढील अपेक्षा
मा.खा.अशोकजी नेते यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अहेरीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलजीवन प्राधिकरणाने आता अधिक जबाबदारीने काम करावे आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या हस्तक्षेपाने पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याची सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी प्रामुख्याने सोबत जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी आकनपल्लीवार,तालुका अध्यक्ष संतोषजी मद्दीवार, शहराध्यक्ष मुकेश नाम्मेवार,.ता.महामंत्री सुकमा हलदार,रमेश समुद्रवार यांसह अहेरीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.