■ खासदार कंगना रानौत आणि अभिनेते अनुपम खेर यांची प्रिमियरला प्रमुख उपस्थिती
नागपूर समाचार : ‘इमर्जन्सी’मध्ये अनेकांनी संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. या संघर्षात सर्वसामान्य लोकही होते. या विषयावर चित्रपट आल्याने आणीबाणीचा इतिहास लोकांना कळेल. नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आणीबाणीविरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार, दि. 11 जानेवारी) येथे केले.
खासदार कंगना रानौत अभिनित व दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे प्रीमियर आज नागपुरात आयोजित करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी आणि अभिनेत्री कंगना रानौत आणि सुप्रसिध्द अभिनेते पद्मश्री अनुपम खेर यांची यावेळी उपस्थिती होती.
मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉल येथील सिनेपोलिस चित्रपटगृहात या प्रेमियरचे आयोजन करण्यात आले. यावेळी आणीबाणीचा काळ अनुभवणारे, त्या काळात तुरुंगवास सोसणारे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
कंगना रानौत म्हणाल्या, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक प्रिमियरला यावेत अशी माझी इच्छा होती. मी नितीनजी यांना विनंती केली. त्यांनी हे सारे घडवून आणले. नितीनजी असे मंत्री ज्यांना भेटून आपल्या कुटुंबातील व्यक्तीला भेटल्यासारखे वाटते. मी लोकसभा निवडणूक लढले तेव्हाही नितीनजी माझ्या प्रचारासाठी हिमाचल प्रदेश येथे आले. आजही मी त्यांना आवाज दिला आणि ते धावून आले.’
अनुपम खेर म्हणाले, ‘नितीन गडकरी यांना भेटून मला कायम आनंद होतो. आज दिवसभर कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभत आहे. त्यांनी इमर्जन्सी चित्रपटाचे प्रीमियर घडवून आणला, याचा विशेष आनंद आहे. नागपुरातील प्रेक्षक खूप चांगला आहे. त्यामुळे इथून चित्रपटाची चर्चा देशात जाईल. नागपूरकर खऱ्या अर्थाने चित्रपटाचे प्रचारक ठरतील.’