नागपूर समाचार : भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनचा पहिला वर्धापनदिन दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती असल्याने या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
हा भव्य कार्यक्रम भारतीय रिअल इस्टेट सल्लागार वेल्फेअर युनियनच्या कार्यालयात त्रिमूर्ती एन आय टी गार्डन, नागपूर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य सल्लागारांनी सहभाग घेतला. संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजवीर सिंह यांनी युनियनच्या पहिल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेताना, संघटनेच्या एकजुटीची प्रशंसा केली. त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील समस्यांवर मात करून सर्व सल्लागारांना न्याय मिळवून देण्यासाठी युनियनने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेवर भाष्य केले.
कार्यकारी अध्यक्ष डॉ. के.एम. सुरडकर यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील काम करण्याच्या पद्धतीवर आणि सल्लागारांनी स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युनियनच्या माध्यमातून सल्लागारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे समाधान करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.
कार्यक्रमात उपाध्यक्ष श्री. संजय कृपान, उपाध्यक्ष श्री. संजय खोब्रागडे, सचिव श्री. मोहन बडवाईक, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष प्रसंगी प्रमुख संपादक आणि आमंत्रित पाहुण्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. दैनिक हमारा लोकत्रक समाचार चे मुख्य संपादक, नागपूर बाजार पत्रिका च्या ज्योती द्विवेदी आणि देश प्रदेश वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहुल शर्मा यांनी उपस्थिती लावली.
यावेळी ज्योती द्विवेदी यांनी सल्लागारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “या क्षेत्रात काम करताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या व्यवहारांच्या प्रक्रियेत आपली प्रतिमा राखणे आणि लोकांचा आपल्यावर विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सल्लागारांनी आपल्या वर्तनात शिस्त आणि सकारात्मकता ठेवली पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक प्रबोध देशपांडे यांनी केले. युनियनचा हा वर्धापनदिन अत्यंत जल्लोषात साजरा झाला असून, कार्यक्रमाने सर्व सल्लागारांमध्ये एकजुटीची भावना निर्माण केली. रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी युनियन सतत कार्यरत राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.